BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ ऑक्टो, २०२३

भावी आमदार इन, माजी आमदार जागेवर तर, विद्यमान आमदार आउट

 







तिऱ्हे रस्त्याच्या कोनाशिलेचा रंगला खेळ !


समाजासाठी ज्याला खरच काही करायचं असतं तो नाव मिळवायच्या मागे धावत नसतो, नव्हे, ज्याला दुसऱ्यासाठी मनापासून काही करायचे असते तो ते करीत राहतो, श्रेय लाटायचा स्वार्थ त्याच्या मनातही येत नसतो. अस असलं तरी राजकारणांत खऱ्या आणि खोट्याही श्रेयासाठी अनेकजण तोंडावर पडतात .... काही वेळा तोंडावर आपटतात देखील पण, श्रेय लाटायची संधी  सोडत नाहीत. नावात काय आहे ? असं काही जण म्हणत असतात.... पण नावासाठी खोट्या कर्तृत्वाचा देखील आधार घेणारी मंडळी आपण राजकारणात पहात असतो.  त्यांच्या या धडपडन्यावर लोक फिदीफिदी हसत असतात पण या महाभागांना त्याचे काहीच वाटत नसते. 


आता हेच पहा ना ! पंढरपूर - तिऱ्हे मार्गाचे उद्घाटन झाले. वर्षानुवर्षे हा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. ग्रामीण भागातील किती पिढ्यांचे मणके या रस्त्याने मोडून टाकले. रक्त सांडले, लोक आक्रोश करीत राहिले पण कुणाच्या कानापर्यंत तो आवाज पोहोचलाच  नाही.  आता निवडणुका जवळ आल्या आणि या रस्त्याचे उद्घाटन झाले.... उद्घाटन झाले पण रस्ता होईल की नाही ? यावर सामान्य नागरिकांचा विश्वास नाही. त्याचे जे काही व्हायचे ते पुढे दिसेलच पण, त्या आधीच श्रेयवादाचा एक वेगळाच खेळ रंगताना दिसू लागला आहे.    


मोठा गाजावाजा करून पंढरपूर तिऱ्हे रस्त्याची कोनशीला बसवली. ही कोनशीला पाहिली की, हा रस्ता खरोखरच जनतेसाठी करण्यात येणार आहे की कुणाची तरी आरती ओवाळण्यासाठी केवळ हा ढोल वाजवला जात आहे ? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. कुठलाही शासकीय कार्यक्रम असला की स्थानिक आमदारांना रीतसर निमंत्रण असणे हा प्रोटोकॉलचा भाग आहे. तसे नाही झाले तर अधिकारी अडचणीत येतात. या कार्यक्रमात मात्र स्थानिक आमदार समाधान आवताडे यांची हजेरी तर नव्हतीच पण, कोनशिलेवर नको त्याची नावे असताना, आमदार आवताडे यांचे नाव मात्र गायब असल्याचे दिसले. 


सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेली ही कोनशीला आहे पण कदाचित, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक आमदार हे समाधान आवताडे आहेत याची माहिती नसावी. अन्यथा अशी चूक दिसलीच नसती, अशा काही बोलक्या प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. माजी आमदारांची नावे कोनशिलेवर झळकत आहेत पण विद्यमान आमदार मात्र या कोनाशिलेवरून बेपत्ता आहेत. कुणाच्या सांगण्यावरून बांधकाम विभागाने हा खेळ खेळला आहे ? असा प्रश्न उपस्थित होण्याआधीच, या मागे कुणाची राजकीय चाल आहे हे लोक सांगू लागले आहेत. 


आमदारांचे नाव बेपत्ता असले तरी दुध संघाच्या चेअरमनचे नाव मात्र या कोनशिलेवर झळकत आहे . माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या पुत्राचे नाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . स्थानिक आमदारांचे नाव नाही पण माढ्याच्या आमदारांच्या पुत्राचे नाव मात्र कोनशिलेवर दिमाखात झळकत आहे. बबनदादा शिंदे यांच्या नावाने पंढरपूर तालुक्यात असलेले आमदार कायम शिमगा करीत आहेतच. त्यात शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलणारे दुसरे शिंदे सतत चर्चेत असतात.  त्यामुळे शिंदे नाव हे बहुचर्चित असताना, आता शासकीय कोनशिलेवर आमदार पुत्राचे नाव यावे हे धक्कादायक आहे. कदाचित पुढील निवडणुकीसाठी हे नाव प्रमोट करण्याचाही हा फंडा असावा. पण तो सरकारी खर्चाने कशासाठी ? याचे उत्तर आता बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानेच द्यावे.  


तिऱ्हे रस्त्यासाठी कधी आंदोलन नाही, कधी लोकांच्या समस्येवर आवाज नाही, तरीही कुठल्या योगदानासाठी हे नाव कोनशिलेवर आले आहे ? याचे उत्तर आता मायबाप सरकारनेच दिले पाहिजे. स्थानिक राजकीय खेळी करणाऱ्याशी हात मिळवणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे अशा मागण्या वेगाने पुढे येताना दिसत आहेत. आमदार समाधान आवताडे यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासोबत अनेक आंदोलने केली आहेत, ते आवताडे या फलकावरून आउट कसे झाले ? कोणी केले ? याची उत्तरे कोणी देईल काय ? माजी आमदारांचे नाव असताना, विद्यमान आमदारांचा हा अवमान कशासाठी करण्यात आला ? हे कुणी सांगू शकेल काय ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !