भोर : चाळीस प्रवासी घेवून चाललेली धावती शिवशाही बस अचानक पेटली आणि पाहता पाहता दूरचे प्रचंड लोट उठले आणि बस जाळून खाक झाली . चालकाने प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी झाली नाही.
उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर धावती वाहने पेट घेतात परंतु अजून तेवढे तापमान वाढलेले नाही. अनेकदा अनेक कारणांनी वाहने पेटल्याच्या घटना घडतात. आज मात्र प्रवाशी घेवून चाललेली शिवशाही बस पेटली आणि आगीचे तांडव उसळले. सांगलीकडून पुण्याला निघालेली शिवशाही बस जळून खाक झाली आहे. सातारा पुणे मार्गाने निघालेली शिवशाही बस भोर तालुक्यातील निगडे यथील राजगड साखर कारखान्यासमोरील उड्डाण पुलावर आली असता अचानकच धूर आला आणि बसने पेट घेतला. काही क्षणात ही आग भडकली आणि धुराचे लोट उसळत बस पूर्णपणे जाळून खाक झाली.
चाळीस प्रवासी घेवून सांगली - स्वारगेट ही बस निगडे गावाजवळच्या उड्डाणपुलावर आली तेंव्हा इंजिनच्या बाजूने धूर येत असल्याचे चालकाला दिसले. त्याने त्वरित गाडी बाजूला घेवून थांबवली आणि तातडीने गाडीतील प्रवाशांना आधी बाहेर काढले. घाईघाईने प्रवासी खाली उतरले पण तेवढ्यात आगीने रौद्र रूप धारण केले आणि आगीच्या ज्वाळा आकाशाच्या दिशेने जावू लागल्या. आग आणि धुराचे प्रचंड लोट उसळले. प्रवासी आणि परिसरातील नागरिक हा थरारक प्रकार दूर अंतरावरून पाहत होते त्यावेळी पहाणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकत होता.
काही क्षणात बस पूर्णपणे आगीच्या स्वाधीन झाली. टायर पेटल्यानंतर तर ही आग अधिकच भडकली आणि टायर फुटू लागले. तयार फुटण्याचे आवाज देखील मोठे होते. चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना वेगाने खाली उतरवले त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले परंतु बसमध्येच राहिलेले त्यांचे सर्व साहित्य मात्र आगीत जळून गेले. या घटनेने मार्गावरील संपूर्ण वाहतूक देखील बंद पडली होती. त्यात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सुरुवातीला बाजूच्या रस्त्यावरून वाहतूक सुरु करण्यात आली आणि नंतर महामार्ग पोलीस आणि राजगड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !