आटपाडी : वाळू तस्करांची मुजोरी बेलगाम होत असून तहसीलदार यांच्या गाडीवर डंपर घालून तहसीलदाराना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.
राज्यात सगळीकडेच वाळू तस्कर (Sand smugglers) बेलगाम आणि मुजोर होऊ लागले आहेत, त्यांना कायद्याचा कसला धाक तर राहिलाच नाही पण ते बेकायदा व्यवसाय करण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या जीवावर देखील उठले असल्याचे वारंवार दिसून येत आहे. आजवर अनके शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हल्ले केले आहेत, वाळू माफियावर कारवाई देखील केली जाते पण मग तरीही वाळू तस्करी तेवढ्याच जोमाने आणि मुजोरीने कशी सुरु राहते ? हा प्रश्न मात्र कायम अनुत्तरीतच असतो. खाजगी चर्चेत मात्र हा व्यवसाय कसा चालतो ? त्यांना कुणाचा आशीर्वाद असतो आणि कुणाचे पाठबळ असते याची मात्र नेमकी चर्चा होत असते.
तहसीलदार बाई माने या आपल्या पथकासह वाळू तस्करी रोखण्यासाठी गस्त घालत असताना हा प्रकार झाला आहे. तहसीलदार यांच्या समवेत तलाठी अमीर मुल्ला, कोतवाल गोरख जावीर, संजय माने आदी या पथकात होते. गाडीतून हे पथक गस्त घालत असताना आटपाडी- निंबवडे रस्त्यावर आबानगर चौकात वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक डंपर या पथकाला दिसला. डंपर चालकाने मात्र हुशारीने पथकाला हुलकावणी दिली आणि तेथून तो अलगद निसटून गेला. तहसीलदार आणि त्यांच्या पथकाच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी या डंपरचा शोध घेण्यास सुरुवात केली.
तहसीलदा बाई माने आणि त्यांचे पथक हुलकावणी देत निघून गेलेल्या डंपरचा शोध घेत असतानाच समोरून भरधाव वेगाने एक डंपर (एम एच ३७ बी ७८६) आला आणि डंपर चालकाने तहसीलदार आणि त्यांच्या पथकाच्या गाडीवर घातला. ( attempt-of-sand-smugglers-to-kill-tahasildar )तहसीलदार यांच्या वाहन चालकाने प्रसंगावधान राखत त्यांची गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही बाजूने जोराची धडक तहसीलदार यांच्या गाडीला झाली. डंपरने तहसीलदार यांच्या गाडीला जोराची धडक दिल्यानंतर ही गाडी आणि डंपर एकमेकात अडकून बसले. त्यामुळे डंपरला तेथून पळून जाता आले नाही. तातडीने तलाठी मुल्ला आणि कोतवाल यांनी डंपर चालकाला पकडले. सदर डंपर हा मुंडेवाडी येथील स्टोनक्रशर मालकाचा असल्याचे सांगण्यात येत असून चालक हा जालना जिल्ह्यातील आहे.
डंपर चालकाने भरधाव वेगातील डंपर तहसीलदार यांच्या गाडीवर घातला पण चालकाने कौशल्याने क्षणात आपली गाडी डाव्या बाजूला घेतल्याने समोरून धडक झाली नाही, सुदैवाने या घटनेत तहसीलदार अथवा त्यांच्या पथकातील कुणाला इजा झाली नाही परंतु गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून वाळू तस्करांची मुजोरी मात्र पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !