BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ मार्च, २०२२

शेतकरी आत्महत्येप्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक !

 




टेंभुर्णी : पंढरपूर तालुक्यात तरुण शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येचे पडसाद (Farmer suicide) तीव्र स्वरुपात उमटण्याची चिन्हे दिसू लागली असून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत पालकमंत्र्यांना इशारा दिला आहे.  


पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील तरुण शेतकरी सुरज जाधव याने सरकारी धोरणावर नाराजी व्यक्त करीत आत्महत्या केली आणि पंढरपूर तालुका सुन्न झाला. एकीकडे डोक्यावर कर्ज असताना दुसरीकडे शेतीचा वीज पुरवठा खंडित केला जाऊ लागला आहे, पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याचे तोंडचा घास हिसकावला जाऊ लागला आहे. यामुळे खचून जाऊन आणि 'पुन्हा शेतकरी म्हणून जन्माला यायला नको'  असे म्हणत त्याने विषाची बाटली घशात ओतली. या घटनेने शेतकरी अस्वस्थ झाला आहे त्याबरोबरच महावितरणच्या भुमिकेविरुद्ध शेतकरी संतापून देखील उठला आहे. 


हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला असून संभाजी ब्रिगेडने आता पालकमंत्री दत्तात्रय भरणे ( Dattatray Bharane ) यांच्यावर ठपका ठेवत इशारा दिला आहे. सततच्या नापिकीचे संकट आणि त्यात महावितरणकडून वीज तोडण्याची होत असलेली कारवाई यामुळे शेतकरी अडचणीत येत असताना पालकमंत्री मात्र सोलापूर जिल्ह्याकडे फिरकत देखील नाहीत.  वारंवार येणाऱ्या अडचणीमुळे शेतकरी बांधवात नैराश्य निर्माण झाले असून त्यातूनच सूरज जाधव या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. वीज खंडित करण्याच्या विरोधात आम्ही चार महिने आंदोलने केली पण पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत यावर भाष्य देखील केले नाही की महावितरण अधिकारी याना जाब विचारला नाही याचा संताप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी व्यक्त केला आहे. 


निष्क्रिय पालकमंत्री दत्तात्रय भरणे याना आता सोलापूर जिल्ह्यात फिरकू देणार नाही, रविवारी पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यात येत आहेत पण त्यांचा हा दौरा संभाजी ब्रिगेड उधळून लावणार आहे असा इशाराही जगताप यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात यायचे असेल तर आधी वीज पुरवठा सुरळीत करावा, त्यानंतरच जिल्ह्यात यावे अन्यथा त्यांचे कार्यक्रम उधळून लावण्यात येतील असा स्पष्ट इशाराच संभाजी ब्रिगेडने दिला आहे. ( Farmer suicide Sambhaji brigade aggressive) त्यामुळे सूरज जाधव याच्या आत्महत्येचा विषय वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नाकर्तेपंणामुळेच शेतकऱ्याची ही आत्महत्या असल्याचा आरोप देखील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी केला आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !