BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ मार्च, २०२२

ऊस फडातच ! तोडणी कामगारांनी सुरु केले ब्लॅकमेल !

 




पंढरपूर : मार्च महिना सुरु असला तरी सोलापूर विभागात अजून १७ टक्के ऊस फडातच उभा असून उस तोड कामगाराकडून देखील ऊस उत्पादकांना ब्लॅकमेल केले जाऊ लागल्याने शेतकरी अडचणीत येऊ लागला आहे.


कष्ट करून आणि कर्ज काढून पिके घेणारा शेतकरी सतत कुठल्या ना कुठल्या अडचणींचा सामना करीत आहे. वीज तोडणीचे संकट सुरूच असताना मार्च महिना सुरु झालेला असला तरी सोलापूर विभागातील १७ टक्के ऊस अजूनही फडात उभा (आणि आडवा ) असून कारखान्यास जाण्यासाठी प्रतीक्षेत आहे. सोलापूर विभागात सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १६ सहकारी आणि ३० खाजगी अशी ४६ साखर कारखान्यांनी २२० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून २०३ लाख टन क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सुरुवातीला उसाची तोडणी वेगाने झाली पण आता मजुरांची कमतरता जाणवू लागली असून जवळपास ३७ लाख टन ऊस फडताच उभा आहे.   

यावर्षी चांगला पाऊस झाल्याने उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ  झाली आहे. सोलापूर विभागात येत असलेल्या उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा अधिक लागवड झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यात १ लाख ७१ हजार हेक्टर  आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर ऊसाची लागवड झालेली असून यंदा २० ते ३० टक्के अतिरिक्त लागवड झाली आहे. यावर्षी अनेक कारखान्यांना गाळपासाठी परवानगी देण्यात आली नसून सुरु असलेल्या कारखान्यानाही हे गाळप उरकताना दिसत नाही.  

कामगार टंचाई !
एकूण परिस्थितीमुळे उस उत्पादक शेतकरी आता कामगारांच्या संकटात येताना दिसत आहे. ऊसाची तोडणी करणाऱ्या मजुरांनी सुरुवातीला करारानुसार उसाची तोडणी केली पण केलेला करार संपल्यावर तोडणी मजूर आपल्या गावी परतू लागले आहेत. कामगारांची कमतरता भासू लागली असून ऊस तोडणारी यंत्रे कमी पडत आहेत. यामुळे गळीत हंगाम संपण्याच्या जवळ येऊन पोहोचला तरी देखील फडातील उस कमी होताना दिसत नाही. शिवाय अपेक्षेपेक्षा अधिक काळ उस शिवारातच उभा राहिला तर त्याचे वजन घटू लागते आणि यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. 

मजुरांकडून अडवणूक !
करार संपल्याने अनेक मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली आणि त्यामुळे मजुरांची कमतरता भासू लागली आहे. जिल्ह्यात सद्या ३३ साखर कारखाने उसाचे गाळप करीत आहेत तरीही अजून १ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रात उस तसाच उभा आहे. या उसाला दीड वर्षांपेक्षा अधिक काळ होऊ लागल्याने उसाला तुरे येऊ लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उसाची नोंदच केलेली नाही त्यामुळे उस रखडू लागला आहे आणि अशाच परिस्थितीत उसाची तोड करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी ८ हजार रुपयांची मागणी कामगारांकडून होऊ लागली आहे. अतिरिक्त लागवड आणि मजुरांची कमतरता यामुळे उपलब्ध मजुराकडून उस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक होताना दिसत आहे. 

हंगाम लांबणार !
विक्रमी गाळप होऊनही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने गाळप हंगाम लांबणार आहे. गाळपाअभावी लाखो टन ऊस अजूनही शिल्लक असून पंढरपूर, माढा, मोहोळ,करमाळा, मंगळवेढा परिसरात असलेल्या शिल्लक उसाला तुरे आलेले आहेत. वजनावर देखील परिणाम होण्याचा मोठा धोका असून सोलापूर जिल्ह्यात १० एप्रिल आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मे महिन्यापर्यंत गाळप हंगाम सुरु राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कुठलाही कारखाना बंद करण्यात येणार नसल्याच्या सूचना करखान्यांना आधीच देण्यात आल्या आहेत. 

शेतकरी अडचणीत !
गतवर्षी अनेक कारखान्यांनी एफआरपी न दिल्याने आर्थिक अडचणीत आलेला शेतकरी आता शिल्लक उसामुळे आणि मजुरांच्या अडवणुकीमुळे अडचणीत येत आहे. मागील एफआरपी न मिळाल्याने शेतकऱ्यांची बाजारातील देणी थकलेली आहेत शिवाय उसाच्या मशागतीसाठी आणखी खर्च करावा लागला आहे. मुलांचे शिक्षण, विवाह, बँक कर्जाचे हप्ते, उधारीवर आणलेली खाते, औषधे यांची देणी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. अशा परिस्थितीत ऊस तोड मजुरांची अडवणूक असह्य होताना दिसत आहे. कामगार जेवण, शुद्ध पाणी आणि पैशाची मागणी करू लागले आहेत. तक्रार केली तर आणखी अडवणूक होईल म्हणून शेतकरी तोंड दाबून हा बुक्क्यांचा मार सहन करताना दिसत आहेत.  अशा सगळ्या कोंडीमुळे अनेक फडातील ऊस पेटताना देखील दिसू लागले आहेत.  
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !