BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ मार्च, २०२२

पंढरीतील 'त्या' तरुणाचा अखेर दुर्दैवी मृत्यू !

 



पंढरपूर : अंधाऱ्या रात्री निर्मनुष्य रस्ता असताना पंढरपूर शहरात झालेल्या अपघातातील 'त्या' तरुणाचा अखेर दुर्दवी मृत्यू झाला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


पंढरपूर शहराच्या बाह्य रस्त्यावर अनेक अपघात होत आहेतच परंतु शहरातून बाहेर जात असलेले रस्ते देखील अलीकडे धोक्याचे झाले आहेत. पंढरपूर शहरातील नवीन कराड नाका, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौक, सरगम चौक ते अहिल्या पूल अशी काही ठिकाणे ही तर अपघाताची प्रमुख ठिकाणे बनू लागली आहेत. रस्ते रुंद झाले परंतु ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आल्याने शहरातील आणि बाहेरची वाहने देखील अत्यंत भरधाव वेगाने जात आहेत. जड वाहने देखील या रस्त्यावर येत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. सरगम चौक ते वाखरी, तालुका पोलीस स्टेशन ते कोर्टी रोड हे मार्ग अधिक धोक्याचे बनले आहेत. 


वाखरी ते सरगम चौक या मार्गावर सतत जड वाहनांचा वावर असतो आणि याच रस्त्यावर ३ मार्च रोजी एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन एक अपघात झाला होता. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाजवळ झालेल्या अपघातात इसबावी येथील शिक्षक वसाहतीत राहणारा १९ वर्षीय तरुण  चैतन्य एकनाथ ढवळे हा गंभीर जखमी झाला होता. २ मार्च रोजी रात्री आठ वाजता काही कामानिमित्त हा तरुण घराबाहेर पडला आणि  दुचाकीवरून आपल्या कामासाठी गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे तो परत येत असताना कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या जवळ आल्यावर त्याच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने धडक दिली आणि या अपघातात चैतन्य जबर जखमी झाला होता. 


पहाटेच्या सुमारास रस्ता निर्मनुष्य असताना हा अपघात झाला आणि अपघात करणारा अज्ञात ट्रक पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या चैतन्य ढवळे यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु होते परंतु उपचार घेतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. ऐन तारुण्यातील मुलगा गेल्याने त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून इसबावी परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दुचाकीला धडक देऊन पळून गेलेल्या अज्ञात  ट्रक चालकाच्या  विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !