BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ मार्च, २०२२

दूध संघाच्या अध्यक्षपदी रणजीतसिंह शिंदे, उपाध्यक्षपदी माळी !





सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी रणजीतसिंह शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी दीपक माळी यांची बिनविरोध निवड झाल्याचे आज घोषित करण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या बहुचर्चित ठरलेल्या निवडणुकीनंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक आज घेण्यात आली. अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे जिल्हयातील दूध उत्पादकांचे लक्ष लागलेले होते.  आज होणाऱ्या अध्यक्ष  आणि उपाध्यक्ष यांच्या निवडीसाठी रात्री उशिरापर्यंत नेत्यांची खलबते आणि चर्चा सुरु होती. अखेर आज ही प्रक्रिया पार पडली आणि अध्यक्षपदी रणजीतसिंह शिंदे यांची दूध संघाच्या चेअरमनपदावर तर माजी आमदार राजन पाटील यांचे समर्थक दीपक माळी यांची उपाध्यक्षपदावर निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

  
जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची निवडणूक यावेळी चांगलीच चर्चेची आणि रंगतदार ठरली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह अन्य काही दिग्गज नेत्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने त्यांना या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही. उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यावर या नेत्यांनी अपीलदेखील केले होते परंतु अपिलात सुद्धा त्यांचे अर्ज अवैध असल्याचा निर्णय आला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देखील जिल्हयातील अनेक नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला होता. 


सदर निवडणुकीनंतर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड आज झाली.  जिल्हा दूध उत्पादक संघाच्या मुख्य कार्यालयात ही निवडणूक घेण्यात आली  २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन निवडी झाल्या आहेत. या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक आज दूध संघाच्या मुख्य कार्यालयात बोलाविण्यात आली होती. नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होताच अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या निवडीवेळी संघाचे १६ संचालक उपस्थित होते.  शिंदे यांच्या अर्जावर सूचक म्हणून औदुंबर वाडदेकर यांनी तर अनुमोदक म्हणून विजय येलपले यांनी सही केली. उपाध्यक्षाच्या निवडीसाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची देखील  बिनविरोध निवड झाली.  



राज्य सरकारने जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती केली होती त्याला आजच एक वर्षे पूर्ण होत असून आजच या नव्या झाल्या आहेत. अडचणीत असलेल्या दूध संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान नव्या संचालक मंडळावर आणि नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासंमोर असणार आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्ष पदासाठी जिल्हा परिषद सदस्य असणारे रणजितसिंह शिंदे आणि योगेश सोपल यांची नावे चर्चेत होती  तर उपाध्यक्ष पदासाठी दिपक माळी यांच्या नावाची चर्चा होती. उपाध्यक्षपदी निवडलेले दीपक माळी हे माजी आमदार राजन पाटील यांचे समर्थक आहेत. 


निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी काम पहिले. आमदार बबनदादा शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, आ. संजयमामा शिंदे, दिलीप माने, दीपक साळुखे, राजन पाटील, सुरेश हसापुरे, रश्मी बागल, बबनराव आवताडे, चंद्रकांत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !