औरंगाबाद : परीक्षेत कॉपी करून देण्यासाठी लाच (Bribe) स्वीकारताना शिक्षणतज्ञ म्हणवून घेणारे संस्थाचालक एस. पी. जवळकर हे रंगेहात पकडले गेले असून शिक्षण खात्याचा कसा खेळखंडोबा सुरु आहे हेच यातून दिसून आले आहे.
राज्यातील अनेक शिक्षण संस्थामध्ये नेमके काय चालते हे जनतेला माहित आहेच. कित्येक शिक्षण संस्था या शिक्षण क्षेत्रालाच बदनाम करू पहात असून या पवित्र विभागाकडेही पैसा कमविण्याचा धंदा म्हणून पाहणारे काही संस्थाचालक आढळून येतात. अनेक प्रकारच्या तक्रारी संस्थाचालक (Educational institution) यांच्याविरोधात येत असताना औरंगाबाद येथील हा वेगळा प्रकार अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावणे, शाळा महाविद्यालयातील गैर प्रकारावर नियंत्रण ठेवणे याकडे संस्था चालकाने लक्ष देण्याच्या ऐवजी परीक्षेत कॉपी करून देण्याचा वेगळा फंडा (Help for copy) आणि पैसे कमविण्याचा धंदा समोर आला आहे. या घटनेने शिक्षण विश्वच हादरले आहे.
दहावी, बारावी परीक्षेत अनेक विद्यार्थी कॉपी करून पेपर लिहित असतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संस्था दक्ष असतात पण परीक्षेत विद्यार्थ्याला कॉपी करून देण्यासाठी संस्थाचालक लाच घेताना सापळ्यात अडकतो हा प्रकार शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का देणारा ठरला आहे. विद्यार्थ्याला कॉपी करून देण्यासाठी संस्थाचालक पी. डी. जवळकर यांनी ३० हजार रुपयांची लाच मागण्यात आली असल्याचा आरोप तर आहेच पण या संस्थाचालकास (Education director arrested for taking bribe) लाच घेताना रंगेहात पकडून अटक देखील करण्यात आली आहे.
संस्थाचालक अटकेत !
बारावी परीक्षेनंतर आज दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या असून या परीक्षेत मदत करण्यासाठी आणि प्रवेशपत्र देण्यासाठी बहिस्थ विद्यार्थ्यास पी. डी. जवळकर पब्लिक स्कूलचे शिक्षण संस्थाचालक संपत पराजी जवळकर (वय ६४) यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितली आणि तडजोड होऊन ही रक्कम दहा हजार रुपयांची ठरली होती. याप्रकरणी विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि त्यानुसार सदर विभागाने पडताळणी करून सापळा लावला. लाचेची रक्कम घेताना शिक्षणतज्ञ संस्थाचालक शाळेतच लाच घेत असताना रंगेहात पकडले गेले. जवळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.
लिपिकाचा सहभाग !
औरंगाबाद शहरात एस पी जवळकर यांच्या शिक्षण संस्था असून जवळकर शाळेतून बहिस्थ विद्यार्थ्याने दहावी परीक्षेसाठी १६ नंबर फॉर्म भरला होता. दहावी परीक्षेचे हॉल तिकीट देण्यासाठी आणि परीक्षेत मदत करण्यासाठी शाळातील लिपिक महिलेने तीस हजार रुपयांची मागणी केली असा दावा करण्यात आला आहे. जवळकर यांच्याच शाळेत सापळा लावण्यात आला आणि जवळकर या सापळ्यात अडकले. याच शाळेतील महिला लिपिक सविता खामगावकर या देखील या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप झाला आहे.
सर्वत्र खळबळ !
दहावी बारावी परीक्षेत कॉपी होवू नये यासाठी शिक्षण महामंडळाचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. भरारी पथकांची निर्मिती केली जाते आणि कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्यावर कारवाई केली जाते. शिक्षण संस्था यांनी देखील याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना असतात पण इथे संस्थेच्या चालकावरच एवढा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा केवळ आरोप नसून त्यासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Shock to education department) विद्यार्थी आणि पालक यांच्यात देखील या घटनेने खळबळ माजली आहे.
हे देखील वाचा :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !