BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ मार्च, २०२२

भीषण अपघातात चारशे फुटावर फेकली कार, डॉक्टरांचा मृत्यू !

 



नागज : सांगोला - मिरज मार्गावर भरधाव कार पलटी होऊन झालेल्या अपघातात मूळचे बार्शी येथील डॉक्टर अरुण मोराळे यांचा मृत्यू झाला तर कारचालक मात्र बचावला आहे. 


रत्नागिरी- नागपूर मार्गाचे रुंदीकरण झाले असून सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच अनके अपघात होऊ लागले आहेत. रस्त्यावर मध्येच मातीचे ढीग, कुठेतरी उकरलेला रस्ता अशी परिस्थिती असल्याने अपघात होत आहेत. चांगला रस्ता असल्याने वाहने वेगात धावत असतात आणि अचानक मध्येच अर्धवट रस्ता किंवा काही कामासाठी वळण रस्ता असे जागोजागी असून चालकाच्या लवकर लक्षात देखील येत नाही. जेंव्हा लक्षात येते तेंव्हा वाहन नियंत्रित करणे कठीण असते. त्यामुळे या रस्त्याजवळ आणि विशेषत: कवठे महांकाळ हद्दीत हे अपघात होत आहेत. 


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मूळ रहिवाशी असणारे डॉ. अरुण मोराळे हे मनीषा नगर, कोल्हापूर येथे राहत होते. आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात ते झोनल मॅनेजर होते. आज ते एम एच ०९ डी एक्स ४६४४ या कारने कोल्हापूर येथून लातूरकडे निघालेले होते.  त्यांची कार कवठे महांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे आली असता रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ढिगाऱ्यावरून दोन वेळा पलटी झाली आणि चारशे फूट अंतरावर जाऊन उभी राहिली. कार दोन वेळा पलटी झाल्याने मागे बसलेले डॉ. मोराळे यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांची कवटी फुटली. यात जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. 


अत्यंत भीषण अशा या अपघातात कार चालक सोहेल सलीम शेख (वय २९, कोल्हापूर) हा मात्र सुदैवाने बचावला आहे, चालक किरकोळ जखमी होण्यावर निभावले. डॉ. मोराळे हे बार्शीचे असले तरी ते कोल्हापूर येथे राहत होते. महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेत ते आठ जिल्ह्याचे झोनल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. एका मिटिंगसाठी ते लातूर येथे निघाले असताना हा अपघात झाला. त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी हे तिघेही डॉक्टर आहेत. ६६ वर्षे वयाचे डॉक्टर मोराळे यांच्या अपघाती मृत्यूने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. 


याच रस्त्याच्या दरम्यान गेल्या महिन्यात असाच भीषण अपघात झाला होता. यात सांगली येथील पती पत्नी ठार झाले होते. यावेळी कार दोनशे फुट हवेत उंच उडाली होती. याशिवाय आणखीही काही अपघात कवठे महांकाळ हद्दीत झाले आहेत. रस्त्याचे अर्धवट काम सतत बळी घेत आहेत पण याकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसत आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !