मोहोळ : पोटासाठी परजिल्ह्यातून आलेल्या गरीब कष्टकरी महिलेचा कालव्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला की बीड, उस्मानाबाद भागातून कष्टकरी मजूर आपली मुलंबाळं पाठीला बांधून पश्चिम महाराष्ट्रात येतात आणि ऊसाची तोडणी करण्याचे कष्टाचे काम इमाने इतबारे करीत असतात. ऊस तोडणी करण्यासाठी आल्यानंतर त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तरीही कसलीही तक्रार न करता ते खाली मान घालून उसाची तोडणी करीत असतात. अशाच एका उस तोडणी मजूर महिलेचा पाय घसरून कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दावी घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वीट येथील मजुराची एक टोळी मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथे उसाची तोडणी करीत आहे. या टोळीत आलेले धनंजय भोसले आणि त्यांची पत्नी धनश्री उर्फ मंजुळा हे देखील या टोळीत उसाची तोडणी करीत होते. उस तोडणी करताना प्रकृती बरी नसल्याने धनश्री या मजूर महिला विश्रांती घेण्यासाठी आपल्या झोपडीत गेल्या होत्या. पती धनंजय हा खाली मान घालून उस तोडणीचे काम करीत राहिला. सायंकाळी काम आटोपून तो झोपडीत आला असता त्याला धनश्री दिसलीच नाही. त्याने आजूबाजूला पाहिले तरी कुठेच दिसली नसल्याने तो काहीसा घाबरला. बाजूला असलेल्या कालव्याकडे त्याने पाहिले असता धनश्री दिसली नाही पण तिची चप्पल कालव्याच्या काठावर दिसली.
चप्पल पाहून धनंजयच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने आपल्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले आणि धनश्रीचा शोध सुरु केला. तेथून काही अंतरावर बाभळीच्या झाडाला अडकलेला धनश्रीचा मृतदेह त्यांना दिसला. हा नक्की काय प्रकार आहे हे लगेच समजू शकले नसले तरी कालव्यात पडून तिचा मृत्यू झाला असण्याचा अंदाज बांधण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी केला आहे. अधिक तपासात पुढील माहिती हाती येईल. सद्या तरी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून पोलिसांनी नोंद केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !