वैराग : अनेक जण पक्षाला सोडून गेले, काही फरक पडला नाही, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संकटात सावरला आणि मजबूतपणे उभा राहिला आहे. काहींच्या नशिबात मंत्रीपद नव्हते त्याला आपण काय करणार ? असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीच्या कालखंडात राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षाला ऐनवेळी सोडून गेले आणि पक्ष संपतोय असे अनेकांना वाटले पण शरद पवार यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला आणि अवघे वातावरण बदलून गेले. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात घेतलेल्या सभेने भाजपच्या मनसुभ्यावर पाणी टाकले. राष्ट्रवादीला संपविल्याच्या वल्गना करणाऱ्या भाजपला तोंडावर आपटी खावी लागली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. ज्या राष्ट्रवादीला फोडले त्याच राष्ट्रवादीचे अजित पवार यांना घेऊन पहाटेचा शपथविधी उरकण्यात आला आणि पुन्हा एकदा भाजपला आपटी खावी लागली . एवढे सगळे घडल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष पुन्हा उभारी घेत असून आता या पक्षात देखील इनकमिंग सुरु झाले आहे.
मागील निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येत नाही असे समजून अनेकांनी पक्ष सोडला आणि भाजपात गेले. पण पक्षाने शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने पक्षाने पुन्हा भरारी घेतली आहे. २०१९ मध्ये पक्षातील लोक सोडून गेल्याच्या या इतिहासावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज वैराग येथे भाष्य केले आहे. आयुष्यभर राष्ट्रवादीसोबत राहिलेले अखेरच्या क्षणी सोडून गेले, मंत्री होणे त्यांच्या नशिबातच नव्हते त्याला आपण तरी काय करणार ? आज त्यातील अनेकांना दु:ख होत आहे. पक्ष संपेल असे त्यांना वाटत होते पण पक्ष सावरला आणि पुन्हा मजबूतपाने उभा राहिला आहे असे जयंत पाटील यांनी वैराग येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
वैराग नगरपंचायतीत पक्षाला सत्ता देणाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, विकास करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही पण सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून काम करावे. पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीचाच झेंडा फडकेल अशा तयारीनेच कामाला लागा असे आवाहन देखील जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. जयंत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या दौऱ्याने राष्ट्रवादीत चैतन्य आणि जबाबदारीचे भान जागविण्याचे काम केले आहे.
सांगोला, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर अशा सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कामचुकार पदाधिकारी यांना खडसावले आहे आणि समन्वयाने काम करण्याचा सल्ला देखील दिला आहे. काही पदाधिकारी केवळ नेत्यांचे कान भरण्याचे काम करीत आहेत त्यांचीही चांगलीच हजेरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील पदाधिकारी कितपत वरिष्ठांचा आदेश पाळतात हे येत्या काळात पहायला मिळणारच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !