BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ फेब्रु, २०२२

ट्रॅक्टर अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याने प्रचंड हळहळ !

 



मंगळवेढा : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने आणखी एक जीव घेतला असून शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने प्रचंड हळहळ व्यक्त  करण्यात येत आहे. 


साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु झाले की निष्पाप लोकांचे जीव घेत काही ट्रॅक्टर रस्त्यावरून सुसाट धावत असतात. अत्यंत बेफिकिरीने आणि वाहतुकीच्या सगळ्या नियमांचा कचरा करीत ही वाहतूक सुरु असते आणि प्रत्येक वर्षी अनेकांचे जीव घेत हे ट्रॅक्टर धावत असतात पण त्यांच्यावर नियंत्रण आणणारे अजूनतरी कुणी पुढे आले नाही. अशाच एका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अवघ्या १४ वर्षे वयाच्या शाळकरी मुलाला धडक देवून त्याचा प्राण घेतल्याची अत्यंत दुर्दैवी घटना मंगळवेढा येथे घडली आहे. 


ज्ञानदीप विद्यालयात शिक्षण घेणारा १४ वर्षे वयाचा कृष्णा सनतकुमार थिटे हा शाळकरी मुलगा सायकलवरूनशाळेतून घरी परत निघाला असताना नागणेवाडी येथे अपघात झाला, ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरने या मुलास जोरदार धडक दिली आणि यात तो गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या या मुलाचा मृत्यू झाल्याने प्रत्येकजण हळहळला. धडक मारून अपघात करणारा ट्रॅक्टरचालक न थांबता निघून गेला. या ट्रॅक्टरचालकाच्या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदर प्रकरणी मयत मुलाच्या पित्याने पोलीसात तक्रार दिली आहे. 


मंगळवेढा येथील फुगारे गल्लीत राहणारा कृष्णा थिटे हा साखर कारखाना रस्त्यावर असलेल्या ज्ञानदीप स्कूलमध्ये आठव्या इयत्तेत शिक्षण घेत होता. घरून रोज तो रेंजर सायकल घेऊन शाळेत ये जा करीत असायचा. शाळेतून तो घराकडे निघाला असताना ट्रॅक्टरने त्याला धडक मारली आणि ट्रॅक्टर तेथून पसार झाला.  या घटनेने मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सनतकुमार थिटे यांचा हा एकुलता एक मुलगा असल्याने या कुटुंबाला तर प्रचंड धक्का बसला आहे. बाह्यवळण रस्ता असताना देखील जड वाहनांची शहरात वर्दळ असते आणि ही जड वाहने सतत धोकादायक ठरत असतात. शहरात येणारी जड वाहने पूर्ण बंद व्हावीत अशी नागरिकांची जुनीच मागणी आहे पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अधूनमधून कधी छोटे तर कधी मोठे अपघात होतच आहेत.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !