BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ फेब्रु, २०२२

संतप्त शेतकऱ्यांनी पेटवले महावितरण कार्यालय !

 



कोल्हापूर : आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतापलेल्या अज्ञात शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयच पेटवून दिले असून आंदोलनाच्या संघर्षाचा अधिकच भडका उडाल्याचे चित्र यातून दिसून आले आहे.


शेतकऱ्याना दिवसा दहा तास शेतीसाठी वीज ज्मिलावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. बेमुदत धरणे आंदोलन सुरु असताना या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शासनाला इशारा दिला असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आंदोलक शेतकरी संतापले आणि त्यांचा संतापाचा 'भडका' झाल्याचे आज कोल्हापूर येथे समोर आले आहे. 


आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कागल येथील महावितरण कार्यालय पेटवून दिले. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयालाच शेतकऱ्यांनी आग लावली. आगीच्या ज्वाला पाहून महावितरण अधिकाऱ्यांना घाम सुटला. अज्ञात शेतकऱ्याकडून लावलेली ही आग नियंत्रणात आणण्यासाठी महावितरणला धावपळ करावी लागली. छत्रपती शाहू साखर कारखाना येथील अग्निशामक गाडी आणून ही आग आटोक्यात आणण्यात आली.  शेतकरी संघटनेच्या संतापाचीच ही आग असल्याचे सांगितले जात असून आता हे आंदोलन अधिक भडकण्याच्या स्थितीत असल्याचेच हे संकेत मानले जात आहेत. 


शेतकरी बांधवास शेतीसाठी पुरेशी वीज मिळत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे शेतकरी अडचणीत येत आहेत. रात्रीच्या वेळेस आणि मर्यादित वेळेत शेतीसाठी वीज पुरवठा होत आहे . हा पुरवठा देखील घोषित वेळेत पूर्ण वेळ होईल याची शाश्वती नसते. रात्रीच वीज मिळते म्हणून शेतकऱ्याना रात्रीचे शेतात राबावे लागते. शेतीसाठी दिवसा आणि पुरेशी वीज मिळावी ही शेतकरी बांधवांची मागणी जुनीच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झाली असून दिवसा दहा तास शेतीसाठी वीज देण्यात यावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या संतापाच्या ज्वाळा आता अधिक भडकणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.  


वीज निर्मितीत साखर कारखान्यापेक्षाही मोठा घोटाळा असून तो आपण लवकरच चव्हाट्यावर आणू असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. जनतेच्या पैशाची लुट करण्यात येत असून कंपनीशी मंत्र्यांचे देखील लागेबांधे आहेत, शेतकऱ्याचे नुकसान करीत असाल तर मंत्र्यांना देखील तुडवू, जनतेच्या घरावर दरोडे घालायचे धंदे आता बंद करावेत. विजेचा धक्का लागल्याने हत्ती मेला तर शेतकऱ्याकडून २५ कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून वसूल केले जाते आणि शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला तर केवळ दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. माणसांपेक्षा जंगली प्राण्यांची किमत अधिक आहे असे देखील राजू शेट्टी यांनी सांगितले आहे आणि आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !