BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ फेब्रु, २०२२

पट्ठ्याने बुक्कीत पाडला बापाचाच दात !

 


सांगोला : मुलांना शिस्त लागावी म्हणून बापाचा नेहमीच प्रयत्न असतो पण सांगोला तालुक्यातील एका पट्ठ्याने बुक्कीत आपल्याच बापाचे दात पाडल्याची घटना घडली आहे.


भांडणात चिडलेली व्यक्ती 'एका बुक्कीत दात पाडेन' अशी धमकी प्रतिस्पर्ध्याला देत असते. अनेकदा भांडण, मारामारी होते तेंव्हा कुणाचा तरी एखादा दात पडतो देखील. पण सांगोला तालुक्यातील एका बहाद्दर पुत्राने आपल्या पित्याचा दात पाडण्याचा आगळा वेगळा पराक्रम केला आहे.  वास्तविक पाहता मोठ्या वयाच्या व्यक्तींचा आदर राखायचा असतो पण नव्या पिढीत तो आदर तर गायब झालेलाच आहे पण थेट जन्मदात्या पित्यावर सुद्धा हात उचलण्याची 'मर्दुमकी' दाखवली जाते हे पुन्हा एकदा या घटनेने समोर आणले आहे. 


पित्याला नेहमीच आपल्या मुलांची आणि घराची काळजी असते, त्यातून तो काही विचारणा करीत असतो पण नेमके हेच सहन न झालेल्या चिरंजीवाने आपल्याच बापावर हात उचलला आणि बुक्कीत दात पाडून वर धमकीही दिली. सांगोला तालुक्यातील कटफळ येथील पांडुरंग दिगंबर वाघमोडे यांनी आपला मुलगा आण्णासाहेब वाघमोडे याच्याकडे ट्रॅक्टरची चौकशी केली. 'ट्रॅक्टर कुठे आहे ?' असा प्रश्न पित्याने आपल्या मुलास केला आणि तेवढ्यावर हा मुलगा भडकला. त्याने आपल्या वडिलांस शिवीगाळ करणे सुरु केले आणि जोराची बुक्की तोंडावर मारली. यामुळे वडिलांचा समोरील दात पडला. एवढे करूनही तो थांबला नाहीत तर त्याने बापालाच धमकी दिली. 'पुन्हा ट्रॅक्टरचे नाव काढले तर जिवंत ठेवणार नाही' अशा शब्दात बापाला धमकावले. 


अखेर या पित्याला पोलिसात धाव घ्यावी लागली. सांगोला पोलिसात या पित्याने आपल्याच मुलाच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी या आण्णासाहेबाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोराचा दात दुखायला लागला तर बाप त्याला तातडीने दवाखान्यात घेऊन जातो पण त्याच पोराने एका बुक्कीत आपल्याच बापाचा दात पडून त्याला जखमी केले आहे. या घटनेची सांगोला तालुक्यात चर्चा देखील सुरु झाली आहे.  


हे देखील वाचा :>> 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !