BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ फेब्रु, २०२२

पंढरीत पोलीस असल्याचे सांगत दागिने लुटले !

 


पंढरपूर : पोलीस असल्याचे सांगत भर रस्त्यावर एका भामट्याने हातचलाखी करीत महिलेचे दोन लाखांचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरात घडली आहे.


लुटमार आणि फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात याचा नेहमीच अनुभव येतो तरीही लोक फसतात आणि लबाड भामट्यांचे फावते. आपण पोलीस असून आपले दागिने काढून जवळच्या पिशवीत अथवा पर्समध्ये ठेवा अशा बतावण्या करून फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. पंढरीतही यापूर्वी असे प्रकार घडले आहेत. पोलीस असल्याची बतावणी करून अशा प्रकारे फसवणूक केली जाते याची आता सर्वांनाच माहिती आहे तरी देखील पंढरीत अशी घटना घडली आणि एका महिलेचे १ लाख ८७ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. 


कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या जवळून जुन्या अकलूज रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. डोंबे गल्लीत राहणारे डॉ. सारंग शहा आणि त्यांच्या पत्नी सीमा शहा हे दोघे आपल्या दुचाकीवरून नातेवाईकांच्याकडे निघाले असताना गांधी बंगल्याजवळ आले असता मागून एक दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आला. त्याने आपण पोलीस असल्याची बतावणी करीत विश्वासात घेतले. 'शहरात चोऱ्या वाढलेल्या आहेत. दागिने घालून असे फिरू नका, असा साहेबांचा आदेश आहे' असे तो सांगू लागला. अंगावरचे दागिने काढून पर्समध्ये ठेवण्याचा सल्लाही त्याने दिला. त्याप्रमाणे सीमा शहा यांनी आपल्या अंगावरील दागिने काढले आणि आपल्या पर्समध्ये ठेवले. 


सव्वा लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याच्या पाटल्या आणि अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र असे १ लाख ८७ हजार रुपये किमतीचे दागिने त्यांनी पर्समध्ये काढून ठेवले. पर्समध्ये खरोखरच दागिने व्यवस्थित ठेवले असल्याची खात्री करून घेण्याचे नाटक करीत या भामट्याने पर्स आपल्या हातात घेतली. दागिने एका पेपरमध्ये गुंडाळून ही पर्स पुन्हा शहा यांच्या हातात दिली. पर्स घेवून शहा आपल्या नातेवाईकांकडे निघून गेले. तेथे गेल्यानंतर त्यांनी पर्स उघडून पुन्हा एकदा खात्री करून घेतली असता त्यांना धक्का बसला आणि भामट्याने हातचलाखी करून आपली फसवणूक केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  पर्समध्ये सोन्याच्या दागीण्याऐवजी स्टीलचे दोन कडे आणि छोटे दगड त्यांना दिसून आले. या प्रकाराने त्या गोंधळून गेल्या. 


पोलीस असल्याचे सांगणारा पोलीस नसून भामटा होता आणि त्याने हातचलाखी करून आपल्याला लुटले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दागिने ठेवल्याची खात्री करीत त्याने पेपरमध्ये दागिने गुंडाळून देण्याचे नाटक करीत हातचलाखी केली असल्याचे लक्षात आले होते पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हा प्रकार लक्षात येताच शहा यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आपली फसवणूक करून लुट झाल्याची तक्रार पंढरपूर शहर पोलिसात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !