सोलापूर : जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे केंद्र असलेल्या सोलापूर दुध संघाच्या निवडणुकीत निवडणुकीच्या आधीच दिग्गजांना धक्का बसला असून माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह २६ जणांचे अर्ज छाननीत बाद ठरले आहेत.
सोलापूर जिल्हा दुध संघ हा जिल्ह्यातील राजकारणातील एक महत्वाचे केंद्र आहे त्यामुळे दुध संघावर जाण्यासाठी सर्वच बड्या राजकीय नेत्यांचा प्रयत्न असतो. सोलापूर जिल्हा दुध संघाची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून वाजत गाजत आहे आणि या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दिग्गज मंडळीनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज या अर्जांची छाननी करण्यात आली आणि बड्या बड्या मंडळीना मोठा धक्का सहन करावा लागला आहे. जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीप माने, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, संचालक दीपक माळी, सिद्धेश्वर आवताडे, प्रभाकर कोरे यांच्यासह २६ जणांचे अर्ज आज छाननीत बाद ठरले आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधीच या नेत्यांना शस्त्र खाली ठेवावी लागली.
निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली यात २६ जणांचे अर्ज बाद ठरले. थकबाकीदार असणे, जातीचे प्रमाणपत्र नसणे, नियमानुसार दुध पुरवठा न करणे अशा कारणामुळे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना तीन दिवसात अपील करता येते. अपिलात त्यांचे अर्ज मंजूर झाले तर त्यांना निवडणूक लढविता येते अशी माहितीही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ही निवडणूक आधीपासूनच चर्चेची ठरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !