इचलकरंजी : दिवसा शेतीसाठी वीज देण्याच्या मागणीसाठी महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या टेबलावर चक्क साप सोडल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांची प्रचंड तारांबळ उडाली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरण विरोधात आंदोलन सुरु केले आहे परंतु त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप करण्यात येत आहे, त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतप्त होत असताना दिसत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवस दहा तास वीज पुरवठा करण्यात यावा ही मागणी घेऊन आंदोलन सुरु ठेवण्यात आले आहे. शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता 'माझी शेती माझी जबाबदारी' या धोरणानुसार रात्री शेतीला पाणी देत असताना आपली काळजी घ्यावी आणि साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर असे जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता सरकारी कार्यालयात आणून सोडावेत असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले होते.
राजू शेट्टी यांच्या या आवाहनानंतर कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात काही शेतकरी कार्यकर्ते साप घेवून गेले आणि सापाची बरणी जिल्हाधिकारी यांच्या हातात दिली होती. काल हे आंदोलन होताच आज इचलकरंजी येथे त्याचाही पुढचा भाग पाहायला मिळाला. महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या टेबलवर थेट साप सोडण्यात आला. शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्यावी या मागणीसाठी करण्यात येत असलेले आंदोलन येथेही वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. दिवसा दहा तास शेतीसाठी वीज देण्याची मागणी करीत महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांच्या टेबलवर या कार्यकर्त्यांनी चक्क एक साप सोडला आणि घोषणा देत महावितरणचा निषेध देखील करण्यात आला.
अधिकारी उपस्थित असताना त्यांच्या टेबलावर थेट साप सोडल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांची तारांबळ उडाली. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देताना जंगली प्राण्यांची भीती असते, सर्पदंश होण्याचा धोका असतो याची जाणीव करून देत पिकाला पाणी देताना आढळलेला साप आणून त्यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडला. अचानक घडलेल्या या प्रकाराने अधिकारी, कर्मचारी गोंधळून आणि घाबरून गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी राडा करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि आश्वासन मिळेपर्यंत हलणार नाही म्हणत तेथेच बसून राहण्याचा इशारा दिला. साप सोडण्याच्या एकूण प्रकाराने एकच गोंधळ आणि तारांबळ उडाली होती. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
शेतीसाठी रात्री वीज दिली जात असल्याने शेतकऱ्याना साप, बिबट्या, गवा, अस्वल अशा विविध जंगली प्राण्यांचाही धोका असतो. शेतकरी शेतीत काम करीत असताना त्याच्या जीविताला देखील धोका होऊ शकतो त्यामुळे शासनाने शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीज द्यावी अशी मागणी करीत सुरु केलेले आंदोलन हळूहळू उग्र स्वरूप धारण करू लागले आहे. आंदोलन सुरु असताना देखील शासन आणि प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आंदोलकांची असून यामुळे हे आंदोलन वेगळ्या वळणावर पोहोचू लागले आहे.( Snake released in msedcl office ) शेतीला रात्री पाणी देत असताना आढळले साप आणि अन्य प्राणी सरकारी कार्यालयात सोडावेत असे आवाहनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केल्याने रोज अशा प्रकारचे आंदोलन समोर येताना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !