मोहोळ : सोलापूर - पुणे महामार्गावर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सावळेश्वर येथील सचिन अंबुरे यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोळ जवळ महामार्गावर कायम अपघात होत असून आणखी एक अपघात करून अज्ञात वाहन पसार झाले आहे. सावळेश्वर येथे राहणारे पस्तीस वर्षे वयाचे सचिन आजिनाथ अंबुरे हे वाहन चालक असून ते पाकणी फाटा येथे बाजार करून येतो म्हणून घरातून बाहेर पडले परंतु दुर्दैवाने ते घरी परतू शकले नाहीत. बाजार करून ते परत सावळेश्वर येथील आपल्या घराकडे निघालेले असताना सावळेश्वर हद्दीत आल्यानंतर त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबियांना कळण्यास उशीर झाला पण जेंव्हा ही माहिती मिळाली तेंव्हा अंबुरे कुटुंबास मोठा धक्क्का बसला आहे.
सचिन अंबुरे हे पाकणी फाट्यावर बाजार करून आपल्या घरी निघाले होते यावेळी सोलापुराकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन चालक तेथून पसार झाला. या धडकेत सचिन अंबुरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सचिन अंबुरे यांचे वडील आजिनाथ अंबुरे यांनी या घटनेची खबर मोहोळ पोलिसात दिली आहे. मोहोळ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर दुर्घटनेने सावळेश्वर परिसरात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !