सोलापूर : सोलापुरात ३१ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे नुकतेच समोर आले होते, आता ४९ शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय चुकतोय की काय ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
कोरोनाची तिसरी लाट सुरु असतानाही राज्य शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला पण प्रत्यक्षात शाळा सुरु होण्याआधी सोलापुरातील ३१ शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा ४९ शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाची तिसरी लाट सुरु असताना आणि रोज प्रत्येक ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना राज्य शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाने शाळेबाबत निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचा भाजपने विरोध केला. काही पालक आणि विद्यार्थ्यातून शाळा सुरु करण्याची मागणी होत होती तर काही पालकांना हा निर्णय योग्य वाटला नाही. अर्थात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना शाळेत येणे बंधनकारक केलेले नाही.
शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार शिक्षकांचीही चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे त्यानुसार सोलापुरातील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ३१ शिक्षक कोरोना बाधित निघाले. नुकतेच निलंगा तालुक्यातील एकाच शाळेतील तब्बल सोळा शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर सोलापुरात आणखी ४९ शिक्षक बाधित आढळले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. शहरातील शाळा सुरु करण्याच्या आधी सर्वच शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. साडे चार हजार शिक्षकांपैकी ३ हजार २०४ शिक्षकांचे अहवाल महापालिका शिक्षण विभागास प्राप्त झाले असून यातील ४९ शिक्षक कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. हे शिक्षक बाधित असले तरी त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. उर्वरित शिक्षकांचे अहवाल अजून येणे बाकी असून त्यामुळे ९६ शाळा सुरु करण्यात आल्या नाहीत.
सोलापूर शहरातील शाळा सुरु झाल्या असल्या तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा मात्र अजूनही बंद अवस्थेत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असल्याने या शाळांना देखील घंटा वाजण्याची प्रतीक्षा लागली आहे. तथापि ग्रामीण माधीर रुग्णसंख्या दीडशेपेक्षा कमी झाल्यावरच या शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होणार आहे. सोलापूर जिल्यातील शाळा, महाविद्यालये सुरु होण्याच्या प्रतीक्षेत असली तरी त्या एवढ्यात सुरु होतील अशी परिस्थिती मात्र दिसत नाही. शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे आढळून येऊ लागल्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्यास पालक कचरणार आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे पालक आधीच दोलायमान स्थितीत असताना शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे आढळत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !