बारामती : तरुणीचे अपहरण करून तिच्या भावाला मारून टाकण्याची धमकी देत बळजबरीने तिच्याशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती येथे उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक देखील केली आहे.
विवाह हा एक मंगल आणि आनंदी सोहळा असतो, दोघांच्या मर्जीने आणि पसंतीने विवाहाचे आयोजन होत असते पण अनेकदा विवाहास तयार नसलेल्या तरुणींना मारून टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. पण बारामती येथील प्रकार यापेक्षा बराच वेगळा आहे. तरुणीला धमकावत, तिला भीती घालत तिचे अपहरण करण्यात आले आणि नंतर तिला आळंदी येथे नेऊन तिच्याशी इच्छेविरुद्ध विवाह लावला पण शेवटी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. तरुणीने जेंव्हा पोलिसात धाव घेतली तेंव्हा हे प्रकरण बाहेर आले.
बारामती येथील ऋषिकेश जगताप याची आणि या तरुणीची आधीपासून ओळख होती. परिचय असल्यामुळे तो सतत तिच्या मागावर असायचा आणि या तरुणीला लग्नाची मागणी घालायचा. या तरुणीची मात्र त्याच्याशी विवाह करण्याची मुळीच इच्छा नव्हती त्यामुळे त्याला तिच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. ऋषिकेश तिच्या मागावर असतानाच तरुणीच्या नातेवाईकांनी तिला पुण्याला जाण्यासाठी बारामतीच्या बस स्थानकावर सोडले पण ही माहिती ऋषिकेश याला लागलीच होती. त्याने तरुणी पुण्याकडे जात असलेल्या बसचा पाठलाग सुरु केला. शहरातील कसबा भागात त्याने या बसला गाठले आणि बस थांबवली. बसमध्ये बसलेल्या या तरुणीस त्याने खाली उतरण्यास सांगितले परंतु तरुणी काही उतरली नाही आणि बस पुढे निघून गेली.
तरुणी बसमधून न उतरल्याने ऋषिकेश अस्वस्थ झाला होता. त्याने त्या तरुणीला मोबाईलवरून संपर्क साधला आणि धमक्या द्यायला सुरुवात केली. 'तू जर माझ्यासोबत आली नाहीस तर तुझ्या भावाला मारून टाकीन आणि मीही आत्महत्या करीन' अशी धमकी ऋषिकेश याने त्या तरुणीला दिली. या धमकीमुळे तरुणी घाबरून गेली. काय करावे हे तिला सुचत नव्हते. अखेर धमकीला घाबरलेली तरुणी पुरंदर तालुक्यातील शिवारी या बस स्थानकावर खाली उतरली . पाठीमागून आलेल्या ऋषिकेशने तिला आळंदी येथे नेले आणि बळजबरीने, तिच्या मर्जीच्या विरोधात तिच्यासोबत विवाह केला. ऋषिकेश याचे मित्र शुभम कराळे आणि किरण खोमणे हे विवाहाच्या वेळी साक्षीदार म्हणून उपस्थित होते.
ऋषिकेश याने केलेल्या बळजबरीपुढे आणि तो देत असलेल्या धमक्यापुढे एकट्या तरुणीचे काही चालले नाही पण विवाह करून सगळे बारामती येथे आले असता तरुणीने शहर पोलीस ठाणे गाठले आणि आपले अपहरण करून लग्न केले तसेच विनयभंग केल्याची फिर्याद तिने पोलिसात दिली. बारामती पोलिसांनी ऋषिकेश जगताप याच्यासह त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला. दोघाजणांना अटक केली असून खोमणे हा मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही. बळजबरीच्या या लग्नाची बारामती परिसरात चर्चा सुरु आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !