BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ फेब्रु, २०२२

माजी सैनिकाच्या बंगल्यावर धाडसी दरोडा !




मंगळवेढा : माजी सैनिकाच्या बंगल्यावर धाडसी दरोडा टाकण्यात आला असून यात लाकडी दांडक्याने मारहाण करून  पाच लाखांचा ऐवज लुटून नेण्यात आल्याने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.


अलीकडील काळात चोरीच्या घटना वाढत असतानाच ही खळबळजन आणि चिंता वाढविणारी घटना घडली आहे. मंगळवेढा शहराच्या लगत असलेल्या पुनर्वसन प्लॉटमध्ये माजी सैनिकाच्या बंगल्यात चोरट्यांनी प्रवेश करून पतीपत्नीला मारहाण करीत लुटमार केली आहे. याबाबत इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका असलेल्या नर्गिस इनामदार यांनी पोलिसात फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार पाच लाख पाच हजार चारशे  रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला आहे.  सोलापूर टोळ नाका परिसरात फिर्यादी  नर्गिस इनामदार या माजी सैनिक असलेल्या चंगेजखान इनामदार या आपल्या पतीसोबत राहतात.   


मध्यरात्र उलटल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा उचकटून इनामदार यांच्या बंगल्यात प्रवेश केला. कडी कोयंडा उचकटताना झालेल्या आवाजामुळे नर्गिस इनामदार या झोपेतून जाग्या झाल्या असता त्यांच्यासमोर त्यांना दोन व्यक्ती हातात लाकडी दांडके घेऊन उभ्या असलेल्या दिसल्या. नर्गिस इनामदार या झोपेतून जागे झाल्याचे दिसताच त्यातील एकाने त्यांच्या पायावर लाकडी दांडक्याने प्रहार केला. जोराचा मार लागल्याने त्या किंचाळल्या. या आवाजाने त्यांचे पतीही जागे झाले. चोरट्यांनी त्यांच्याही मानेवर लाकडी दांडक्याने हल्ला केला. त्यानंतर त्यांना खाली झोपवत त्यांच्या चेहऱ्यावर ब्लॅंकेट टाकले. यामुळे चंगेजखान इनामदार बेशुद्ध पडले असे फिर्यादीत नमूद केले आहे. 


चोरटयांनी फिर्यादी इनामदार याना पुन्हा मारहाण करीत जागेवरून हलण्यास मनाई करीत बंगल्यात त्यांनी सोन्याचे दागिने आणि रकमेची शोधाशोध सुरु केली. काही चोरटे हॉलमध्ये गेले आणि कपाट उघडले. कपाटात ठेवलेले मनगटी घड्याळ, सोन्याचा राणीहार, गंठण, लॉकेट, चार अंगठ्या, रिंगा, कर्णफुले असे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पन्नास हजार असा पाच लाखांचा ऐवज चोरटयांनी डोळ्यादेखत लुटून नेला. या घटनेने मंगळवेढा तालुक्यात दहशत निर्माण झाले आहे. चोरीच्या घटना नेहमीच होतात पण मारहाण करून डोळ्यादेखत लूटमार करण्याची ही घटना थरारक होती. 


लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने इनामदार पती पत्नी जखमी झाले असून माजी सैनिक असलेले चंगेजखान इनामदार याना उपचारासाठी सोलापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. मंगळवेढा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.  नागरिकात मात्र या घटनेने असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे.       

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !