BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ फेब्रु, २०२२

आजारी नवऱ्याचा गळा चिरणाऱ्या बायकोला जन्मठेप !


सांगली : आपल्या आजारी नवऱ्याचा वस्तऱ्याने गळा चिरणाऱ्या बायकोला सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने दहा हजार रुपये दंडासह जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 


पत्नी आपल्या आजारी पतीची अखेरच्या क्षणापर्यंत सेवा करते परंतु तासगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या शांताबाई उर्फ शोभा कलाप्पा बागडी या २५ वर्षीय पत्नीने आजाराने त्रस्त असलेल्या आपल्याच पतीचा गळा वस्तऱ्याने चिरला आणि त्याचा खून केला होता. हा खून करूनही तिने पोलिसांसह सगळ्यांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिचा डाव फसला आणि आता सत्र न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 


शांताबाईंच्या पतीला टी.बी. चा आजार होता आणि या आजाराने तो त्रस्त झालेला होता. त्याला काही कामधंदा देखील करता येत नव्हता. पत्नी असून देखील शांताबाई आपल्या नवऱ्याला कंटाळली होती. त्यातूनच २०१९ मध्ये जेवण देण्याच्या कारणावरून या पती पत्नीच्या दरम्यान वाद झाला. या वादात पत्नी शांताबाई हिने घरात असलेला वस्तरा घेतला आणि थेट आपला पती कलाप्पा याचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला कलाप्पा काही क्षणात गतप्राण झाला पण शांताबाई हिने आपल्या पतीने आत्महत्या केल्याचे भासवले. तशी खबर देखील तिने तासगाव पोलिसांना दिली होती.  


पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असता त्यांना तपासात वेगळीच माहिती मिळाली. कलाप्पा यांनी आत्महत्या केलेली नसून त्यांचा खून झाला असल्याचे आणि तो पत्नी शांताबाई हिनेच केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार तपास करून पोलिसांनी शांताबाईच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिला गजाआड केले होते. शांताबाईने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असला तरी पोलिसांनी खरी माहिती बाहेर काढली आणि न्यायालयाने तिला दहा हजार रुपये दंड आणि जन्मठेप अशी शिक्षा सुनावली.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !