BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ फेब्रु, २०२२

बोगस खतामुळे शेतकऱ्यांना लाखोंचा फटका !




शोध न्यूज  : नकली खतामुळे  द्राक्ष उत्पादक प्रचंड अडचणीत आले असून माढा तालुक्यात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


शेतकरी जीवापाड कष्ट करून आणि कर्ज काढून पिके जोपासत असतो तरीही त्याला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यात नकली बियाणे, खते, औषधे त्यांच्या पदरात मारली जात असल्यामुळे त्यांचे कंबरडेच मोडून जाते. असाच प्रकार माढा तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.  द्राक्षांच्या बागासाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांमुळे द्राक्षांचे घड जळून गेल्याचे माढा तालुक्यातील बावी परिसरात दिसून आले आहे. बोगस खतांच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर खतांची तपासणी प्रयोगशाळेत केल्यानंतर ही खतेच नकली असल्याचे समोर आले आहे. 


नकली खतांचा वापर केल्याने सुमारे पाचशे टन द्राक्षांचे नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बोगस आणि नकली रासायनिक खते विकून शेतकरी बांधवांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी संबंधित दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही आता पुढे आली आहे.  फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी मोडनिंब येथील दुकानातून ही खते विकत घेतली होती आणि ती द्राक्षांच्या बागेसाठी वापरली होती. त्यानंतर द्राक्ष जळू लागली आणि मग हा गैरप्रकार आणि फसवणूक असल्याचे द्राक्ष उतपादाकांच्या लक्षात आले.   


संबंधित शेतकरी यांनी कृषी विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर संबंधित दुकानातील खतांचे नमुने पुण्याच्या शासकीय प्रयोग शाळेत पाठवून तपासणी केली असता सदर खतात ७० अन्नद्रव्यांचे कमी प्रमाण असल्याचा अहवाल आला. या खतात घातक पदार्थ असल्याचेही आढळून आले आहे.  असा प्रकार समोर आल्यामुळे शेतकरी बांधवात प्रचंड खळबळ उडाली असून आता संबंधित दुकानदार आणि खत कंपनी यावर काय कारवाई होतेय याकडे लक्ष लागले आहे. कुणाच्या तरी आर्थिक फायद्यासाठी शेतकरी मात्र प्रचंड नुकसानीत आला आहे. या घटनेने अन्य शेतकरी मात्र सावध झाले आहेत.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !