तुळजापूर : खासदार, आमदार यांच्यासाठी पुढे पुढे करणाऱ्या पुजाऱ्याना तुळजाभवानी देवस्थानाने चांगलीच चपराक लगावली असून या पुजारी मंडळीना मंदिरात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे.
मंदिरात पुजारी मंडळी कधी काय करता येईल हे सांगता येत नाहीच परंतु तुळजाभवानी मंदिरात तर पुजारी हे सतत चर्चेत आणि वादात राहत आहेत. तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात सकाळी आणि सायंकाळच्या अभिषेक पूजेच्या नंतर फक्त महंत, पाळीकर पुजारी यांनाच प्रवेश करता येईल असे आदेश जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानाचे अध्यक्षांनी या आधीच काढलेले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करताना पुजारी दिसतात आणि त्यांच्यावर तातडीने कारवाई देखील केली जाते. खासदार, आमदार यांच्यासाठी या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे व्यवस्थापकांनी पुजारी मंडळींवर ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष यांनी आदेश काढलेले असतानाही तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यात खासदारांना घेऊन जाताना पुजारी मंडळीनी सुरक्षा रक्षकांनाच दमदाटी केली म्हणून चार पुजाऱ्याना सहा महिन्यासाठी तर अन्य तिघांना वेगळ्या कारणासाठी तीन महिन्यांसाठी मंदिर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. शिवसेनेचे अन्य पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासाठी दरवाजा उघडला जावा म्हणून दमदाटी करण्यात आली. दरवाजा उघडण्यास नकार दिल्यावर 'खासदार साहेबाना कुंकू लावायचे आहे' असे सांगत चावी मागितली आणि चावी घेऊन कुलूप उघडून खासदारांना देवीच्या चरणावरील कुंकू लावण्यात आले.
एकूण प्रकरणाबाबत सुरक्षा रक्षक सचिन पवार यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार आणि सीसीटीव्ही फुटेज यावरून मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक असलेल्या तहसीलदार यांनी चौघांवर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी यांचा आदेश असताना केवळ आमदार, खासदार मंदिरात आले म्हणून त्यांच्या पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करीत या पुजारी मंडळीनी आदेशाचा भंग तर केलाच पण सुरक्षा रक्षकांना दमदाटी करून त्यांच्याकडून चावी घेतल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने कडक भूमिका घेत त्यांना मंदिर प्रवेश बंदी केली आहे.
२५ पुजाऱ्यावर कारवाई !
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात निजामकालीन देऊळ कवायत कायद्याप्रमाणे आजही कारभार चालतो. त्या कायद्यानुसारच संबंधितांवर कारवाई केली जाते. या कायद्यानुसार गैरवर्तन करणाऱ्या पुजाऱ्यांना कलम २४ आणि २५ यानुसार मंदिरात प्रवेश करण्यास बंदी करण्यात येते. या कायद्यानुसार महिन्याभरात २५ पेक्षा अधिक पुजाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
चोरीचा प्रयत्न फसला !
कर्नाटक राज्यातील भाविक परिवार मंदिरात देवदर्शन करण्यासाठी आलेले असताना सागर कदम या पुजाऱ्याने त्यांची दिशाभूल केली आणि देवीला अर्पण करण्यासाठी आणलेली नथ आणि पैशाचा गल्ला चोरी करून हा पुजारी घरी घेऊन गेला. हा प्रकार उघडकीस आल्यावर त्याने नथ आणि पैसे परत दिले. त्याच्यावर देखील मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे. या आधीही अनेक पुजारी मंडळीवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !