BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ फेब्रु, २०२२

अजित पवार यांच्यासह दहा जण लवकरच जेलमध्ये जाणार !

 



मुंबई : दोन मंत्री जेलमध्ये गेले आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण दहा जण लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचे सांगत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बारा नेत्यांची नावेच जाहीर करून टाकली आहेत. 


राज्यातील पहाटेचा शपथविधी फसला आणि भाजपला तोंडावर आपटण्याची वेळ आली तेंव्हापासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा वावर आणि कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा पूर्वीपासून कार्यरत असल्या तरी दोन वर्षात राज्यातील प्रत्येकाला या यंत्रणा माहित झाल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्री यांनीं अनेकदा केला असून या यंत्रणा देखील आता बदनाम होताना दिसत आहेत. 


राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीचेच दुसरे मंत्री नबाब मलिक यांना देखील अटक करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील राजकारण अत्यंत दुषित झाल्याचे दिसत असून सामान्य नागरीकातून तर अत्यंत कडवट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का लागत असला तरी अजून त्यांच्या लक्षात हे येत नसल्याचेही दिसून येत आहे. भाजपचे नेते आधीच जाहीर करतात आणि त्याप्रमाणे ईडी कारवाई करते हे काही आता लपून राहिलेले नाही. महाविकास आघाडीचे बारा नेते जेलमध्ये जाणार असे किरीट सोमय्या अनेकदा सांगत होते पण आज त्यांनी या १२ नेत्यांची नावेच जाहीर केली आहेत. 


अनिल देशमुख, नबाव मलिक यांच्यानंतर अटकेसाठी कोणाचा नंबर आहे यावर बोलताना किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवले आहे.  आता कुणाला अटक होणार हे पत्रकार विचारत असून त्यासाठी चिट्ठी टाकावी लागणार आहे आणि ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी यांनी काढावी आणि कुणाला आधी तुरुंगात पाठवायचे हे देखील त्यांनीच ठरवावे असे म्हणत किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील बारा नेत्यांची नावे जाहीर केली असून यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे देखील नाव त्यांनी घेतले आहे. 


आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत पण महाराष्ट्राला  लुटणाऱ्या 'डर्टी डझन' नेत्यांचा हिशोब होणार आहे, 'डर्टी डझन' ही केवळ नावेच नाहीत तर त्यांनी केलेले घोटाळे सिद्ध झाले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घोटाळा देखील सिद्ध झाला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आणि हिम्मत असेल तर ठाकरे यांनी उत्तर द्यावे असे थेट आव्हानच सोमय्या यांनी दिले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता आंदोलन करून काही फरक पडणार नाही, त्यांच्यावर आधीच तपास आणि कारवाई सुरु झाली आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याबाबत निर्णय आला आहे आता आणखी एक मंत्री अनिल परब यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्यावरील प्रक्रिया देखील आधीच सुरु झाली आहे असे त्यांनी सांगितले. 


बारा नेत्यामधील महाविकास आघाडीचे दोन नेते तुरुंगात गेले आहेत आता उरलेले दहा नेते तुरुंगाच्या वाटेवर आहेत असे सांगून किरीट सोमय्या यांनी उर्वरित दहा नेत्यांची नावे आज घोषित केली आहेत. यात अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड यांचा समावेश असल्याचे सोमय्या यांनी सांगितले  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !