BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ फेब्रु, २०२२

भीमा साखर कारखान्यावर दुर्घटना, कामगाराचा मृत्यू !

 



मोहोळ : भीमा साखर कारखान्यावर काल रात्री मोठी दुर्घटना होऊन एका  कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक कामगार जखमी झाला आहे. मोलॅसिस टाकीचा स्फोट होऊन हा अपघात झाला आहे. 


मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु असून कारखान्यावरील चार हजार लिटर क्षमतेच्या मोलॅसिस टाकीचा स्फोट झाला आणि हे दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा एक कामगार जखमी झाला. कारखान्याच्या रसायन विभागात चार हजार क्षमता असलेल्या मोलॅसिसच्या दोन टाक्या असून यातील एका टाकीतून मोलॅसिस भरण्याचे आणि वितरणाचे काम सुरु होते. हे काम सुरु असतानाच या टाकीचा अचानक स्फोट झाला. 


मोहोळ तालुक्यातील औंढी येथील ५९ वर्षे वयाचे कामगार विष्णू महादेव बचुटे हे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. अंकोली येथील ऋषिकेश शिवाजी शिंदे हे २५ वर्षे वयाचे दुसरे कामगार जखमी झाले. ते किरकोळ जखमी झाले असले तरी त्यांना लगेच उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मृत्युमुखी पडलेले विष्णू बचुटे हे सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते पण दुर्दैवाने त्यांचा या दुर्घटनेत अंत झाला. जेवणाच्या सुट्टीच्या वेळी ही घटना घडली. सुट्टी झाल्याने शिंदे हे हात पाय धुण्यासाठी थोडे बाजूला गेले होते तर मयत झालेले बचुटे हे तेथेच जेवणासाठी बसलेले होते. 


सुमारे दोन हजार लिटर मोलॅसिस असलेली टाकी फुटल्याने जवळच असलेल्या गोदामाचे देखील दोन्ही शटर तुटले आणि द्रवरूप मोलॅसिसमुळे साखर भिजली गेली. या दुर्घटनेत कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून निवृत्तीच्या उंबरठयावर असलेल्या कामगाराला मृत्यू आल्याने मोहोळ तालुक्यातून प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !