पुणे : विना परवाना ऊसाचे गाळप केल्याबद्धल राज्यातील अनेक कारखान्यांसह सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांना साखर आयुक्तांनी कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला असून कारखाने मात्र या विरुद्ध अपिलात गेले आहेत.
राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांनी मागील वर्षाची शेतकऱ्यांची उसाची बिले दिली नाही. एफआरपी देण्याबाबत शेतकरी सतत आक्रोश करीत आहेत परंतु ही रक्कम देण्यास सहकारी साखर कारखाने असमर्थ ठरले आहेत. कारखाने आर्थिक अडचणीत आले असून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही अडचणीत आणले आहे. अशा कारखान्यावर साखर आयुक्त यांनी आसूड उगारलेला आहे. अनेक कारखान्यांना यावर्षी गाळप करण्यास परवानगी देण्यात आली नाही पण काही कारखान्यांनी परवानगी नसताना ऊसाचे गाळप केले आहे. अशा कारखान्यांना आता भरमसाठ दंड केला जात असून यात सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा समावेश आहे
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखान्यास २ कोटी ६४ लाख १० हजार तर पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्यास १ कोटी ९४ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. बार्शीच्या इंद्रेश्वर शुगरला ४ कोटी ७९ लाख २१ हजार, करमाळा येथल मकाई सहकारी साखर कारखान्यास ५ कोटी ६३ लाख ५००, टाकळी सिकंदर (मोहोळ ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्यास ६७ लाख ५ हजार, माळशिरस येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्यास ८ कोटी ९५ लाख ६४ हजार, करमाळा येथील विठ्ठल रिफाईंडला १ कोतो ४७ लाख ७७ हजार ५०० रुपये असा भरभक्कम दंड आकारण्यात आला आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील १६ साखर कारखान्यांना ६१ कोटी ३३ लाख ६३ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखान्याचा या कारवाईत समावेश आहे. संबंधित कारखान्यांना तशा नोटीसा देखील पाठविण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांसह पुणे जिल्ह्यातील चार, सांगली जिल्ह्यातील दोन आणि उसमानाबाद, सातारा, हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. विनापरवाना गाळप केले म्हणून हा दंड करण्यात आला असून या सर्वच साखर कारखान्यांनी दंडाच्या विरोधात शासनाकडे अपील केले असल्याने अद्याप हा दंड वसूल करण्यात आलेला नाही.
पुणे जिल्ह्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील इंदापूर, नीरा भीमा इंदापूर, छत्रपती सहकारी इंदापूर, घोडगंगा सहकारी शिरूर तर सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसान अहिर वाळवा, विश्वासराव नाईक शिराळा, सातारा जिल्ह्यातील शरयू फलटण यासह भीमाशंकर शुगर वाशी (उस्मानाबाद), टोकाई सहकारी वसमतनगर (हिंगोली) अशा कारखान्यांचा समावेश असून उस्मानाबाद येथील कारखाना वगळता सर्व कारखान्यांना करण्यात आलेले दंड हे कोटींच्या आकड्यात आहेत.
हे देखील वाचा : पंढरपूर तालुक्यात दोन आत्महत्या !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !