पंढरपूर : उद्या शिवभक्तीचा मोठा सण साजरा होत असतानाच शिवभक्तीच्या उत्साहाची वेगळीच क्रेझ पंढरपूर शहारात अनुभवयाला मिळत असून तरुण मंडळी आपल्या डोक्यावर शिवप्रतिमा कोरून घेताना दिसत आहेत.
राजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात कणाकणात आणि मनामनात अढळ आहेत पण शिवभक्तांचा उत्साह शिवजयंतीच्या निमित्ताने ओसंडून वाहू लागला आहे. शिवजयंतीचा प्रेरणेचा आणि प्रचंड उत्साहाचा दिवस जवळ येऊ लागल्यापासून मराठी माणसांच्या मनांना एक वेगळाच शिवस्पर्श होतो आणि नसानसातून शिवभक्ती संचारताना वेगळीच अनुभूती येत असते. यावेळी मात्र पंढरीतील तरुण शिवभक्तात एक वेगळीच क्रेझ दिसून येऊ लागली असून अनेक तरुण आपल्या डोक्यावर शिवप्रतिमा कोरु लागले आहेत. यात अनेक छोट्या मुलांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे.
उद्या शनिवारी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा सगळीकडे साजरा होत असून अवघे तनमन शिवमय झालेले आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी ज्याची त्याची लगबग सुरु आहे. मनामनात जपल्या जात असलेल्या राजा शिवछत्रपतींचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहेच पण मनातल्या राजांचा आविष्कार अनेक तरुणांनी वेगळ्या पद्धतीने साकार केला आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा अनेकांनी डोक्यावर कोरून घेतली आहे. कुणी राजांची प्रतिमा तर कुणी राजमुद्रा कोरली आहे तर कुणी ढाल तलवारीचा आविष्कार डोक्यावर साकार केला आहे. कुणी 'मराठा' तर कुणी 'राजे' अशी अक्षरे कोरून घेतली आहेत.
पंढरपूर येथील नाभिक समाजातील अवलिया माऊली चव्हाण यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुबक पद्धतीने डोक्यावरील केसातून या प्रतिमा साकारल्या आहेत. केसातून प्रतिमा कोरून तिच्यात जीव ओतणे ही तशी अवघड बाब आहे पण चव्हाण हे लिलया साकार करीत आहेत. कागदावर चित्र काढताना देखील त्यात भाव उतरणे अवघड असते. माउली चव्हाण यांनी मात्र डोक्यावर केसातून प्रतिमा कोरताना देखील शिवछत्रपतींच्या चेहऱ्यावरील आणि डोळ्यातील भाव देखील कायम ठेवले आहेत. अत्यंत सुबक कलाविष्कार साकार करणाऱ्या माऊली चव्हाण यांचे देखील कौतुक होताना दिसत आहे.
शिवजयंतीचा उत्साह तर अद्वितीय असतोच पण तरुणांच्या मनातील शिवभक्ती अशा रुपात साकार झालेली आहे. चित्रपट अभिनेत्यांचे किंवा क्रिकेट खेळाडूंचे अनुकरण तरुणात अधिक प्रमाणात केले जाते असा समज आहे आणि तसे अनेकदा दिसूनही येते. पंढरीत मात्र या तरुणांनी आपल्या हृदयातून शिवजयंतीचा उत्साह कसा ओसंडून वाहत आहे हेच दाखवून दिले आहे. तरुणांच्या मनात शिवभक्तीची पेटलेली ही ज्योत भविष्य नक्कीच प्रकाशमान करील याचेच हे संकेत देखील आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !