BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ फेब्रु, २०२२

कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या केंद्राच्या सूचना !

 



मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ओसरत असतानाच निर्बंधाबाबत नव्याने आढावा घेत अतिरिक्त निर्बंध मागे घेण्याच्या सूचना केंद्र शासनाने राज्यांना दिल्या आहेत त्यामुळे अनेक निर्बंध हटण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 


कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्यामुळे पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लावण्यात आले होते. आता कोरोनाची तिसरी लाट परतू लागली असल्याने निर्बंध कमी होण्याबाबत गेल्या काही दिवसांपासूनच चर्चा सुरु झाली आहे. मास्कपासून सुटका होण्याची चर्चा देखील झाली होती परंतु एवढ्यात तरी मास्कमुक्ती मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते. राज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत अथवा हटविण्याबाबत शासन पातळीवर देखील चर्चा सुरु झाली होती. राज्याची जरी अनुकुलता दिसत असली तरी केंद्र सरकार काय भूमिका घेतेय हे अधिक महत्वाचे होते पण आता केंद्रानेच याबाबत पुढाकार घेतला असून अतिरिक्त निर्बंध मागे घेण्याच्या सूचना केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता राज्यानाही काही निर्णय घेण्याचा मार्ग खुला झाला आहे.  


संपूर्ण देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटली आहे. रोज आढळणारे कोरोना रुग्ण आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण याचा आढावा घेऊन कोरोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घेण्यात यावेत अशा स्पष्ट सूचना केंद शासनाने राज्यांना दिल्या आहेत.  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रात या सूचना करण्यात आल्या आहेत. २१ जानेवारी पासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आलेख घसरलेला दिसत असून मागील आठवड्यात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या ५० हजार ४७६ एवढी आहे. रुग्णांची वाढ होऊ लागली होती त्या वेळेस अनेक राज्यांनी आपल्या सीमा आणि  विमानतळावर अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. सार्वजनिक आरोग्य संकटाचा सामना करताना या आवश्यक बाबी आहेत.  सद्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे राज्यातील कोरोनाच्या तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि निर्बंध कमी करावेत. कोरोना नियंत्रणासोबत नागरिकांचे जीवन आणि त्यांच्या उपजीविकेवरील कोरोनाचा दुष्परिणाम कमीत कमी असेल याच्यावर भर दिला जावा असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.


निर्बंध हळूहळू कमी करीत असताना पंचसूत्रीचे पालन करणे आवश्यक असल्याचे मात्र सांगण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी चाचणी, रुग्णांचा शोध, उपचार, लसीकरण आणि नियमांचे पालन यावर मात्र भर दिला जावा हे केंद्र सरकारने अधोरेखित करून सांगितले आहे. रुग्णांची संख्या आणि लसीकरणाचा आढावा रोजच्यारोज घेतला जावा अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत. 


हे देखील वाचापंढरपूर तालुक्यात दोन आत्महत्या !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !