BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ सप्टें, २०२२

भगर खाल्ल्याने शेकडो लोकांना विषबाधा !

 



शोध न्यूज : उपवासासाठी भगर खाल्ल्यामुळे शेकडो स्त्री पुरुषांना विषबाधा झाली असून भगर खाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. 


सद्या नवरात्र उत्सव सुरु असून या दिवसात महिला आणि पुरुषही उपवास करतात. उपवासासाठी साबुदाणा, भगर खाल्ली जाते, सलग उपवास असल्यामुळे नवरात्रीच्या काळात भगरीलाच अधिक पसंती दिली जाते पण ही भगर धोक्याची ठरत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही असा प्रकार घडला होता आणि भगर खाणारे अनेक लोक रुग्णालयात जाऊन पडले होते. त्यावेळी देखील भगरीचा वेगळा प्रताप समोर आला होता आणि आता यावर्षीही असे धक्कादायक प्रकार घडू लागले असून शेकड्यांवर लोक विषबाधेने त्रस्त झाले आहेत. उपवासाची भगर लोकांच्या जीवावर उठली असल्याचे चित्र समोर आले आहे. 


नवरात्री उपवासाच्या निमित्ताने भगर खाल्याने औरंगाबाद, वैजापुर्म लासूर, गंगापूर, जालना परिसरात शेकडो लोक रुग्णालयात दाखल झाले आहेत. पहिल्याच दिवशी सुमारे तीनशे स्त्री पुरुषांना विषबाधा झाल्याची बाब समोर आली आणि एकच खळबळ उडाली आहे.  नवरात्र सुरु होण्याच्या आधीच लासूर स्टेशन, वैजापूर आदी गावातून बंद पाकिटातून भगर विकण्यात आली होती आणि ही भगर बाजारापेक्षा कमी दरात मिळत होती. दुकानापेक्षा स्वस्त दरात भगर मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ही भगर विकत घेतली होती. उपवास सुरु होताच लोकांनी हीच भगर खाल्ली आणि त्याचा त्रास झाला आहे. 


भगर खाल्ल्यानंतर उलटी, चक्कर, अंगदुखी, मळमळ अशा प्रकारचे त्रास सुरु झाले आणि पाहता पाहता हा त्रास शेकडो लोकांना होत असल्याचे समोर आले. जो तो रुग्णालयाच्या दिशेने पळू लागला आणि वैजापूर तालुक्यातील खाजगी आणि सरकारी दवाखाने रुग्णांनी भरून गेले. त्यानंतर जिल्ह्यातील अन्य तालुक्यात देखील असेच प्रकार घडत असल्याचे समोर आले.  वैजापूरचे  आमदार रमेश  बोरनारे यांनी विविध रुग्णालयात जाऊन पाहणी  केली तसेच रुग्णांची विचारपूस केली. (Be vigilant while fasting, Mass poisoning from Bahgr) त्यानंतर त्यांनी भगर खाणे टाळावे असे आवाहन करीत ही भगर कोणी विकली ? या भगरीत भेसळ आहे काय? याची तपासणी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. 


अन्य जिल्ह्यातही विषबाधा !

असेच प्रकार अन्य जिल्ह्यातही घडत असल्याचे समोर आले आहे. बीड, औरंगाबाद प्रमाणे बुलढाणा, जालना जिल्ह्यातही अशा  घटना घडलेल्या आहेत. परतूर तालुक्यात देखील भगर खाल्ल्यामुळे काही जणांना विषबाधा झाली आहे, यात महिलांचे प्रमाण अधिक असून विषबाधा झालेल्या रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !