BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ फेब्रु, २०२२

राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्यांना ईडी चा दणका !



मुंबई : राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्यांना ईडी चा मोठा दणका बसला असून उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. 


महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यापासून आणि भाजपचे अडीच दिवसांचे सरकार गेल्यापासून राज्यात सक्तवसुली  संचालनालयाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून गेल्या दोन वर्षांपासून राज्यात केवळ केंद्रीय तपास यंत्रणांचीच चर्चा आहे. त्यात राष्टवादीचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे दुसरे नेते  अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील आणखी दहा नेते लवकरच तुरुंगात जातील असे सांगत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक यादीच जाहीर केली आहे. या यादीची चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीचे तिसरे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर ही कारवाई झाली आहे. 


उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची सुमारे १३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे.  या कारवाईचा फटका काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांना देखील बसला आहे. कारण या साखर कारखान्याची नागपूर येथील ९० एकर जमीन देशमुख यांच्या 'तक्षशिला सिक्युरिटी' ने खरेदी केली होती आणि ही जमीन देखील ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.  राज्यमंत्री तनपुरे यांच्या दोन जमिनी ईडीकडून जप्त करण्यात आल्या असून त्यांची किमत सुमारे ७ कोटी ६० लाख एवढी आहे. यात अहमदनगर येथील चार एकर जमिनीचा देखील समावेश आहे.  मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून २०१९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या तक्रारीच्या आधारे ईडीने कर चुकविल्याप्रकरणी चौकशी सुरु केली होती. त्यानंतर ईडीने देखील तनपुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.


तत्कालीन अधिकारी आणि राज्य सहकारी बँकेच्या संचालकांनी संगनमत करून राम गणेश गडकरी साखर कारखाना कवडीमोल किमतीत तनपुरे यांना विकला, यावेळी कोणत्याही योग्य प्रक्रियेचे पालन केले गेले नव्हते, अशा प्रकारचा आरोप आहे.  २६.३२ कोटी रुपयांचे मूल्य असताना केवळ १२.९५ कोटीला हा कारखाना विकण्यात आला होता याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने आपला अहवाल न्यायालयात दिलेला असून ही सुनावणी प्रलंबित आहे. ईडीची कारवाई होणारे तनपुरे हे राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री आहेत.      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !