BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ फेब्रु, २०२२

पंढरीत संभाजी ब्रिगेड आक्रमक, राज्यपालांच्या प्रतिमेचे दहन !

 


पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पंढरीत संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन करण्यात आले. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा वाद पेटू लागला असून राज्यभरातून निषेधाचे पडसाद उमटले असून ठिकठिकाणी विविध पद्धतीने शिवप्रेमीनी आपल्या संतापला वाट मोकळी करून दिली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवराय हे प्रत्येकाच्या मनामनात अढळ स्थान असलेले परमदैवत आहेत परंतु महाराजांविषयी काहीतरी बडबड करून राजकारण करण्याचे पातक कुणीतरी मधूनच करीत असते. केवळ राजकारणासाठी शिवरायांच्या नावाचा वापर केला जातो.  खोटा इतिहास सांगण्याचा 'पराक्रम' देखील काही जण करीत असतात पण ते उघडे पडतानाही पहायला मिळत असतात. अशा पार्श्वभूमीवर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून महाराष्ट्र संतप्त झाला आहे. 


'समर्थ  नसते तर शिवाजीला कुणी विचारले असते का '? असा सवाल राज्यपाल कोश्यारी यांनी उपस्थित केला आणि राज्यभर संतापाचे पडसाद उमटू लागले आहेत. औरंगाबाद येथे बोलताना राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी, "देशात गुरु अशी परंपरा आहे की, ज्याला सद्गरु मिळाला म्हणजे सगळे काही मिळाले आणि सद्गुरू नाही मिळाला तर काहीच मिळालं नाही. समर्थांच्या शिवाय शिवाजीला कोण विचारेल तरी का ?" असे विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले. राज्यपाल एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी ' गुरुदक्षिणा म्हणून या राज्याच्या चाव्या तुम्हाला देतो असे शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते' असा देखील दावा कोश्यारी यांनी केला आहे.


पंढरीत संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. कोश्यारी यांच्या प्रतिमेचे दहन करण्याचा देखील प्रयत्न केला. कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा अथवा महामहीम राष्ट्रपतींनी त्यांना पदावरून दूर करावे अशी संतप्त मागणी ब्रिगेडने केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच त्यांच्या नावाने बोंबा देखील मारण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्यानंतर त्यांना पदावर राहण्याचा कसलाही अधिकार शिल्लक उरत नाही, छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय कुठलेही सरकार सत्तेवर येऊ शकत नाही, बोलताना भान न राहणारे राज्यपाल असतील तर महाराष्ट्रात दंगली होतील, अशा राज्यपालांना तत्काळ पदावरून हटविण्यात यावे अन्यथा मराठा समाज त्यांना राज्यात कुठेही फिरू देणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.  


राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या अवमानकारक विधानाचे पडसाद राज्यभर उमटले असून पंढरीत देखील संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील प्रचंड संताप व्यक्त केला असून आज ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. राज्यपालांनी या विधानाबाबत महाराष्ट्राची माफी मागावी आणि आपले विधान मागे घ्यावे, तसे  नाही केले तर त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या गुरु - शिष्य परंपरेचा दूरदूरपर्यंत संबंध येत नाही असा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला होता असे सांगत राज्यपालांनी न्यायालयाचा देखील अवमान केला असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.  संभाजी ब्रिगेड देखील प्रचंड आक्रमक झाली असून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.  


बंद यशस्वी !

मराठा आरक्षण मागणीसाठी आज पुकारलेल्या पंढरपूर बंद ला उदंड प्रतिसाद मिळाला असून व्यापारी बंधूनी स्वयंस्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेऊन या आवाहनाला प्रतिसाद दिला. या प्रतीसादाबद्धल मराठा संघटनाच्या वतीने धन्यवाद देण्यात आले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !