BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ फेब्रु, २०२२

अशा बेशुद्ध झाल्या होत्या लता मंगेशकर !






एक आठवण लतादीदींची !



कळत नकळत माणसाच्या आयुष्यात बऱ्याच गाेष्टी घडत असतात, घडून जातात. कधी त्या गमतीदार असतात तर कधी त्या मनाला चटकाही लाऊन जातात. सगळ्यांच्याच आयुष्यात असे क्षण येत असतात. कळत नकळत घडलेल्या या गाेष्टीही माणसाला बरंच काही शिकऊन जात असतात. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचीही अशीच एक घटना घडली हाेती. पी.सावळाराम यांचं एक गाणं करताना लता मंगेशकर बेशुध्द पडल्या आणि सावळाराम यांच्यासाठी हा आयुष्यभर मनात जपण्याचा क्षण ठरला.


एखादा चित्रपट असाे किंवा त्या चित्रपटातील एखादं गाणं असाे, प्रत्येक कलाकृतीमागे अनेक आठवणी दडलेल्या असतात. कुठलीही नवी निर्मिती हाेताना बरंच काही घडत असतं आणि ते मनाच्या खाेल कप्प्यात कायमचं जपलं जातं. गीतकार, संगीतकारांना तर आपल्या काेणत्याही गाण्याची एखादी ओळ जरी कानावर पडली तरी त्या गाण्याच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास आणि त्यावेळी घडलेल्या लहान सहान घटनाही आठवतात. केवळ आठवतच नाहीत तरी जशाच्या तशा त्या डाेळ्यासमाेर उभ्या राहतात. आठवणीतला काेणता क्षण पकडावा आणि काेणता साेडून द्यावा हे कळतही नसतं. प्रेक्षकांना आणि श्राेत्यांना माहित नसतं पण कित्येक गाण्यांचे जन्मही अशाच एखाद्या पण विशेष क्षणी झालेले असतात. 



गंगा जमुना डाेळ्यात उभ्या का...

जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा.


हे पी.सावळाराम यांचं गाणं आजही रेडीओवर लागलं की अनेकांची मनं गलबलून जातात. कळत नकळत मनाच्या खाेलवर ही गाणी पाेहाेचतात आणि श्राेता काही काळ निशब्द हाेऊन वेगळ्याच वातावरणात जाताे. अनेकांना सासरी गेलेल्या आपल्या मुलीची आठवण येते आणि त्याचं मन सैरभैर हाेतं. किती ताकद असते संगीतात आणि गाण्यात. या गाण्याने अमरत्व मिळवले आहेच परंतू श्राेते हे गाणं ऐकताना त्या भावनेशी एकरूप हाेतात. पी.सावळाराम यांची डाॅक्टर असलेली मुलगी त्यांच्याजवळ असली आणि रेडिओवर हे गाणं वाजायला लागलं की ही मुलगी सावळाराम यांच्या गळ्यात पडून हंबरडा फोडल्याचे अनेकदा घडले आहे. या गाण्याचा जन्मही अशाच एका प्रसंगातून झालेला आहे. १९४८ सालातला ताे प्रसंग पुण्याच्या रेल्वेस्थानकांवर घडताना पी.सावळाराम यांनी पाहिला आणि त्या प्रसंगातून हे गाणं शब्दात उतरलं. 


एक खेडुत तरूणी सासरी निघाली हाेती. ती रेल्वेत पी.सावळाराम यांच्या बाकासमाेरच बसलेली हाेती. तिला निराेप देण्यासाठी तीची आई रेल्वे स्थानकावर आली हाेती. सासरी जाताना त्या नवविवाहित तरूणीला आपलं घर साेडताना यातना हाेत हाेत्या आणि ती आपल्या आईच्या गळ्यात पडून रडत हाेती. आईही रडत हाेती.. ‘तुला लहानपणापासून तळहाताच्या फोडासारखं जपलं... आज लग्न करून तू मलाच साेडून चालली आहेस, आता मला आई म्हणून काेण हाक मारील गं..’ असं आई रडत रडत लाडक्या पाेरीला विचारत हाेती. 


भावनेने ओथंबलेला हा प्रसंग पाहून आजूबाजूच्या माणसांच्या डाेळ्यातही पाणी आलं हाेतं. सावळारामही हा प्रसंग पाहून आपले डाेळे पुसत हाेते. रेल्वे हलणार असल्याची सूचना देणारी शिट्टी वाजली आणि आईला अधिकच गलबलून आलं. कसंबसं स्वत:ला सावरत ती  आपल्या मुलीला म्हणाली, ‘आता कशाला डाेळ्यात गंगा जमुना आणतेस? जा, आता आपल्या घरी सुखात रहा’ पी. सावळाराम यांच्या मनात हा प्रसंग काेरलेला हाेता. पुढे काही महिन्यांनी सावळाराम यांनी ‘गंगा जमुना डाेळ्यात उभ्या का.., जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा..’ हे गाणं लिहीलं आणि ते आजही श्राेत्यांच्या ओठावर आणि मनावर कायम आहे.


एकदा लता मंगेशकर यांनी सावळाराम यांना आपल्या वडीलांवर एखादं गाणं लिहावं अशी इच्छा व्यक्त केली. लतादीदींची आपल्या बाबांवर अपार श्रध्दा आणि प्रेम. सावळाराम यांना त्यानंतर काही काळानं एकदम दाेन ओळी सुचल्या आणि त्यांनी त्या लिहील्या. तेवढ्याच ओळी त्यांना लतादीदींना दाखविल्या.


‘कल्पवृक्ष कन्येसाठी, 

लाऊनिया बाबा गेला... 

वैभवाने बहरून आला, 

याल का हाे बघायला..’


लता मंगेशकरांनी या दाेन ओळी ऐकल्या पण काहीच प्रतिसाद दिला नाही त्यामुळे या ओळी त्यांना आवडल्या नाहीत असं सावळाराम यांना वाटलं. पण तसं नव्हतं, लता मंगेशकर रडत हाेत्या, त्यांना काही बाेलताही येत नव्हतं. ‘मला बाेलवत नाही, तुम्ही पुढे लिहा..’ असं लताबाईंनी सावळाराम यांना सांगितलं. गाणं लिहून झालं. त्याचं ध्वनीमुद्रण करण्याचं काम सुरू झालं. या गाण्याच्या रेकाॅर्डिंगवेळी स्टुडिओतलं वातावरण बदललेलं हाेतं. वसंत प्रभूंनी हे गाणं पहिल्याच टेकमध्ये हे गाणे केले कारण हे गाणं गाताना लता इतक्या भावनाविवश हाेत्या की त्यांच्याकडून दुसऱ्यांदा हे गाणं गायलं जाणं कठीण हाेतं. 


लता मंगेशकरांनी हे गाणं गायलं पण शेवटी बाबाऽऽऽ असा आक्राेश करीत लतादीदी खाली काेसळल्या. त्या बेशुध्द झाल्या हाेत्या. संपूर्ण स्टुडिओ एक वेगळा अनुभव अनुभवत हाेता. हे गाणं गाताना लता मंगेशकर नेहमीसारख्या नव्हत्या. त्या केवळ गाणं गात नव्हत्या तर आपल्या लाडक्या बाबांच्या आठवणीत हरऊन गेल्या हाेत्या. गाण्याच्या निमित्तानं त्यांच्या डाेळ्यासमेार बाबा दिसत हाेते आणि या गाण्यातल्या भावना बाबांना अर्पण हाेत हाेत्या. भावनेनं ओथंबलेलं हे गाणं लताबाईंनी कसंबसं संयम राखत पूर्ण केलं खरं पण गाणं संपताच त्यां स्वत:ला सावरू शकल्यार नव्हत्या. त्या जशा खाली काेसळल्या तशा त्या बेशुध्द झाल्या हाेत्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !