BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ फेब्रु, २०२२

गोळीबाराने हादरला सोलापूर जिल्हा. वेळापूर - सांगोला मार्गावर गोळीबार !

 




पंढरपूर : माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे अंधाराचा फायदा घेत झालेल्या गोळीबाराने सोलापूर जिल्हा हादरून गेला असून हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या परंतु यातून तरुण नशिबानेच बचावला आहे.


सोलापूर जिल्हात गुन्हेगारी वाढत चाललेली असतानाच आता गुन्हेगारांचे धाडस  गोळीबार करण्यापर्यंत पोहोचले गेले असल्याचे या घटनेवरून दिसू लागले आहे. वेळापूर येथे ३२ वर्षे वयाचा तरुण प्रवीण शशिकांत सावंत (रा. कोळेगाव)  यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या परंतु सुदैवानं त्यांना गोळी लागली नाही. एक गोळी त्यांच्या गाडीत घुसली तर दुसरी हवेतून गेली. सावंत हे या गोळीबारातून अगदी थोडक्यात बचावले आहेत पण माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्हा या घटनेने हादरून गेला आहे. सावंत यांचा पाठलाग करून हा गोळीबार केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. वेळापूर येथील दूधगंगा दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेच्या समोर ही घटना घडली. 


मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण सावंत हे सांगोला - वेळापूर रोडवरून चार चाकी गाडीने (एम एच १० बी जी १००२) निघाले असता वेळापूर येथे एका दुकानासमोर त्यांनी गाडी उभी केली आणि वडापाव घेण्यासाठी म्हणून ते गाडीतून खाली उतरले. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सावंत यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या आणि लगेच ते तेथून पळून गेले. चार चाकी गाडीच्या मागच्या दरवाजाला एक गोळी लागली परंतु यात जीवितहानी झाली नाही. या घटनेने वेळापूर येथे एकच खळबळ उडाली आणि लोक सैरावैरा झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला.  या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !