BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ फेब्रु, २०२२

पोलीस कर्मचाऱ्यानेच खंडणीसाठी केले एकाचे अपहरण !

 


पुणे : तीनशे कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी आणि आठ लाख रुपये खंडणीसाठी पोलिसानेच एकाचे अपहरण केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे पोलिसातील वाढिती गुन्हेगारी अधोरेखित झाली आहे. 



'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' अर्थात सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनाचे निर्दालन करण्याचे ब्रीद घेऊन काम जाणाऱ्या पोलीस विभागात देखील काही गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी असतात याचा अनेकदा अनुभव आला आहे. लाचखोरीत तर पोलीस विभाग आघाडीवर असतोच पण गुन्हेगारी जगताशी असलेला संबंध देखील अनेकदा समोर आला आहे. याशिवाय स्वतःच गुन्हे करणारी काही मोजकी मंडळी खाकी वर्दीच्या आड दडलेली देखील दिसत असून पुण्याच्या पिंपरीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


पिंपरी पोलीस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या एका पोलिसाने तीनशे कोटीच्या क्रिप्टो करन्सीसाठी आणि आठ लाखाच्या खंडणीसाठी  अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून दिलीप खंदारे नावाच्या या पोलिसांस पोलिसांनीच बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यासह आठ जणांच्या देखील मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांनी विनय नावाच्या एका व्यक्तीचे अपहरण केले पण पोलीस आपल्या मागावर असल्याची माहिती मिळताच त्यांनी विनयला सोडून दिले आहे. पोलीस कर्मचारी दिलीप खंदारे यांच्यासह  सुनील शिंदे, वसंत चव्हाण, फ्रान्सिस डिसुझा, मयूर शिर्के, प्रदीप काटे, संजय बन्सल, शिरीष खोत या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. 


विनय यांच्याकडून क्रिप्टो करन्सी आणि आठ लाखांची खंडणी घेण्याची योजना तयार करण्यात आली होती. १४ जानेवारीस विनय याचे अपहरण झाले असल्याची तक्रार वाकड पोलिसात देण्यात आली होती. विनयच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके टायर केली होती आणि सीसीटीव्ही तसेच मोबाईलच्या आधाराने पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला होता. पोलीस आपल्या मागावर असल्याची चाहूल या आरोपीना लागली आणि मग त्यांनी अलिबाग येथे डांबून ठेवलेल्या विनयची मुक्तता केली. पोलीस कर्मचारी दिलीप खंदारे आणि प्रदीप काटे यांच्याच सांगण्यावरून हे अपहरण करण्यात आल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आणि मग पोलिसांनी त्यांना अटक केली. बाकीच्या आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेऊन खास आपल्या स्टाईलने तपास सुरु केला तेंव्हा त्यांनी या अपहरणाची कबुली तर दिलीच पण अन्य दोघांची नावे देखील उघड केली. त्यात या पोलीसाचा समावेश होता.   


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असणारा दिलीप खंदारे हा यापूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या सायबर क्राईम विभागात होता आणि याचवेळी त्याला विनय यांच्याकडे तीनशे कोटींची क्रिप्टो करन्सी असल्याची माहिती मिळाली होती.  प्रदीप काटे यांच्यासह प्लॅन आखून हा  मोठा गुन्हा केला असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली. एवढ्या मोठ्या गुन्ह्यात पोलीस कर्मचारीच मुख्य आरोपी निघाल्याने पोलीस दलाला देखील हादरा बसला आहे आणि नागरिकांच्या मनात असलेला पोलिसांवरील विश्वास देखील ढासळला आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !