मंगळवेढा : जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविलेल्या पाच ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदानास पात्र ठरविले आहे त्यामुळे त्यांना आता सरपंच निवडणुकीत मतदान करता येणार आहे.
सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांना अपात्र ठरवले होते. सदस्य म्हणून अपात्र ठरल्यानंतर अशा सदस्यना सरपंच निवडीच्या मतदानात भाग घेण्याचा प्रश्नच येत नाही परंतु अशा पाच सदस्यांना निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी यांनी पाच सदस्यांना अपात्र ठरवलेल्या निर्णयास राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु पी एस मदान यांनी स्थगिती दिल्याने त्यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकला आहे.
मरवडे येथील ग्रामपंचायत निवडणूक झाली तेंव्हा निवडणूक आयोगाच्या संहितेप्रमाणे निवडणूक खर्च सदर करण्याबाबत नियमांचे उल्लंघन करण्यात आले. सरपंच, उपसरपंच आणि अन्य तीन सदस्यांनी विहित नमुन्यात खर्च सादर केला नसल्याबाबत बालाजी पवार यांनी तक्रार केली होती. हे पाचही जण सत्ताधारी गटाचे सदस्य आहेत. पवार यांच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सुनावणी घेतली आणि सरपंच सचिन घुले, मीनाक्षी सूर्यवंशी, अंजना चौधरी, सुमन गणपाटील, दीक्षा शिवशरण या पाच सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी आदेशाच्या दिनांकापासून अपात्र ठरवले होते.
या अपात्र सदस्यांना पुढील पाच वर्षे सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यावरही निर्बंध घातले होते. जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयावर राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली होती. कोरोनाचा कालावधी असल्याने बँकेत खाते उघडण्यात आले असले तरी व्यवहार करता आले नाहीत, शिवाय निवडणूक खर्च वेळेत सदर केला असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्याने निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशास स्थगिती दिली आहे. त्यामुळे या पाचही सदस्यांना आता सरपंच निवडणुकीत मतदान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु या दरम्यान सरपंच सचिन घुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीत या पाच सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !