मंगळवेढा : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे जग चिंतेत असताना वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले सोलापूर जिल्ह्यातील २५ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून यात पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
भारतातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी युक्रेन येथे जात असतात. युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धाला सुरुवात झाल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक बनली असून अनेक भारतीय तेथे अडकल्याची माहिती उपलब्ध होत असतानाच मंगळवेढा तालुक्यातील सहा विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवेढा तालुक्यातील हे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेले होते. कमी खर्चात चांगले शिक्षण मिळते म्हणून मंगळवेढा तालुक्यातील सहा विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणासाठी युक्रेन येथे गेले आहेत.
युद्ध सुरु झाल्याने विमानसेवा ठप्प झाल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील हे विद्यार्थी अडकून पडलेले आहेत. यात मंगळवेढा (दामाजीनगर ) येथील प्रथमेश अनिल माने, आंधळगाव येथील अभिजित काका चव्हाण, ब्रह्मपुरी येथील प्रथमेश शिवाजी कांबळे, भलेवाडी येथील रितेश बाजीराव गवळी आणि नागणेवाडी यथील प्राजक्ता दादा भोसले आणि बठाण येथील सुप्रिया सुभाष खटकाळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदर विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले असून काही जण पहिल्या तर काही तिसऱ्या वर्षात एमबीबीएस चे शिक्षण घेत आहेत. भारतापेक्षा युक्रेनमध्ये कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण मिळते म्हणून हे विद्यार्थी गेले आहेत.
युद्धाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे पाहून या विद्यार्थ्यांनी भारतात येण्यासाठी विमानाचे तिकीट बुकिंग केलेले होते परंतु हे तिकीट २७ फेब्रुवारीचे होते. त्याआधीच युक्रेनमधील परिस्थिती बिघडली आणि विमानसेवा बंद पडली त्यामुळे त्यांना अडकून पडावे लागले आहे. या विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क असून सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. जिल्हाधिकारी सोलापूर हे माहिती घेत असून जिल्ह्यातील सहा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती हाती आलेली आहे. जिल्ह्यातील आणखी कुणी अडकले आहेत का ? याचीही माहिती घेतली जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात सुखरूप आणण्यासाठी भारत सरकारच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील २५ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून २० विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा प्रशासनाच्या हाती आली आहे. यात पंढरपूर तालुक्यातील सहा, सांगोला तालुक्यातील चार, सोलापूर शहरातील दोन, मोहोळ दोन, बार्शी तालुक्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !