कोल्हापूर : साप, बिबट्या, गवा यासारखे जंगली प्राणी शासकीय कार्यालयात आणून सोडावेत असे आवाहन शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले आणि आज खरोखरच कार्यकर्त्यांनी एक साप आणून थेट जिल्हाधिकारी यांच्याकडेच दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरण विरोधात आंदोलन छेडले आहे परंतु त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप करण्यात येत आहे, शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवस दहा तास वीज पुरवठा करण्यात यावा ही मागणी घेऊन आंदोलन सुरु ठेवण्यात आले आहे. शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता 'माझी शेती माझी जबाबदारी' या धोरणानुसार रात्री शेतीला पाणी देत असताना आपली काळजी घ्यावी आणि साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर असे जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता सरकारी कार्यालयात आणून सोडावेत असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले होते. या आवाहनाची चर्चा होत असतानाच कार्यकर्त्यांनी याची पूर्तता देखील केली.
राजू शेट्टी यांच्या आवाहनानुसार नरंदे येथील शेतकऱ्यांना रात्री शेतीला पाणी देत असताना आढळलेला साप थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आणला आणि जिल्हाधिकारी यांच्या हवाली केला. जंगली प्राण्यांचे संवर्धन आणि जोपासना करणे ही पूर्णपणे शासनाची जबाबदारी आहे त्यामुळे शासकीय कार्यालयात हा साप आणण्यात आला. जंगली प्राण्यापासून शेतकऱ्यांना रात्री धोका असल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दिवस वीज द्यावी अशी मागणी आम्ही करीत आहोत पण तसे नाही झाले तर यापुढे बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर असे सापडलेले जंगली प्राणी या कार्यालयात सोडण्यात येतील असे यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी सांगितले.
विविध प्रश्नासाठी विविध संघटना वेगवेगळी आंदोलने करीत असतात. शासन आणि प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी नवनव्या पद्धती आंदोलनात वापरण्यात येत असतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मात्र पूर्वीपासूनच इतरांपेक्षा वेगळे ठरले असून त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देताना रात्रीच्या वेळी आढळलेला एका साप आज एका डब्यात बंद करून जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केला. या आंदोलनाची कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जोरदार समर्थन मिळताना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !