BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ फेब्रु, २०२२

दुसऱ्याच्या शेतात काम करणारा सालगडी झाला कोट्याधिश !


 

शोध न्यूज : दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने अशी काही जादू केली की वर्षाकाठी त्याची स्वतःची आर्थिक उलाढाल सहा कोटी रुपयावर गेली आहे. 


शेतकरी सतत अडचणीत असतो आणि त्याच्या कष्टाला बाजारात देखील काही किंमत मिळत नाही. अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेले असतात आणि या कर्जातून काही शेतकरी आत्महत्येचे चुकीचे पाउल देखील उचलतात. मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पानकनेर गावातील संतोष शिंदे या शेतकऱ्याने मात्र शेतकऱ्याला एक नवा मार्ग दाखवत मोठा आत्मविश्वास देखील झाला आहे. कधीकाळी दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करणारे संतोष शिंदे आता वर्षाकाठी कोट्यावधी रुपयांची उलाढाल करतात.  हे सगळे जादुई वाटून जाते परंतु हा प्रवास पहिला की अनेक जण थक्क होऊन जातात. 


संतोष शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांची वडिलार्जित असलेली थोडीशी शेती आहे. आधीच थोडी शेती आणि ती देखील कोरडवाहू असल्यामुळे शेतातून त्यांना आवश्यक उत्पन्न मिळत नव्हते. उपजीविका करण्यासाठी त्यांनी दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम केले. सालगडी म्हणून काम करताना देखील त्यांना गरजेएवढा पैसा मिळू शकत नव्हता त्यामुळे त्यांनी नर्सरी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि केवळ एका गुंठ्यात त्यांनी नर्सरी सुरु केली. सुरुवातीला त्यांनी झेंडूच्या रोपांची निर्मिती केली आणि त्यांना यात चांगला आर्थिक लाभ होत असल्याचे दिसून आले. चांगला पैसा मिळतो हे लक्षात आल्यावर त्यांनी हाच व्यवसाय मोठ्या स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला. 


नर्सरी व्यवसायासाठी लागणारे पाणी त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते त्यामुळे त्यांनी थेट साठ फुटांची विहीर खोदली आणि सुदैवाने या विहिरीला चांगले पाणीही लागले. या पाण्यावर त्यांनी नर्सरी पोसायला सुरुवात केली आणि नर्सरीचा व्याप हळूहळू वाढवत आता आठ एकर क्षेत्रात त्यांची नर्सरी पसरली आहे.  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत त्यांनी विविध प्रजातींच्या रोपांचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. त्यांची नर्सरी आता हायटेक तर बनली आहेच पण दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम केलेल्या या संतोष शिंदे यांच्या नर्सरीत शंभर कामगारांना काम उपलब्ध झाले आहे. 


संतोष शिंदे यांनी हा व्यवसाय सुरु केला आणि आता ते दर वर्षाला सहा कोटी रुपयांची उलाढाल करू लागले आहेत. उत्तम रोपे मिळत असल्याने राज्यातून तर मागणी आहेच पण अन्य राज्यातून देखील त्यांच्या रोपांना मागणी येत आहे. मागणी एवढी वाढली आहे की त्यांनी आता रोपांची वाहतूक करण्यासाठी तब्बल चार ट्रक विकत घेतले आहेत आणि त्याद्वारे ग्राहकांनी सांगितलेल्या ठिकाणी सुस्थितीत ते रोपे पोहोच करतात. जिद्द आणि चिकाटी असली की सामान्य शेतकरी आणि दुसऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणारेही कोट्यावधीची उलाढाल करू शकतात ही प्रेरणा शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या या प्रगतीचे परिसरात कौतुक तर केले जातेच पण प्रेरणा म्हणून देखील त्यांच्याकडे पहिले जाते. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !