कोल्हापूर : शेतकरी विरोध करीत असतानाही उसाच्या बिलातून वीज बिलाच्या वसुलीस सुरुवात झाल्याचे दिसत असून राज्यातील एका कारखान्याने अशी वसुली केल्याचे समोर आले आहे.
शेतकऱ्याने साखर कारखान्याला गाळपासाठी दिलेल्या ऊसाची बिले आधीच वेळेवर मिळायला तयार नाहीत. शेतकरी आंदोलन करून थकले तरी मागील एफआरपी रक्कम त्यांना अजून मिळालेली नाही. कारखान्याकडून रक्कम मिळालीच तर त्यातून अनेक रकमांची वसुली केलेली असते. त्यात आता वीज बिलांचीही वसुली ऊसाच्या बिलातून वसूल करण्याची चर्चा सुरु झाली होती आणि याला ऊस उत्पादक शेतकरी प्रखर विरोध करीत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अशा वसुलीला जाहीर विरोध केलेला आहे. तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील एका सहकारी साखर कारखान्याने अशी वसुली केल्याचे समोर आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ऊस बिलातून शेतकऱ्यांचे वीज बिल वसूल करण्याची चर्चा सुरु होती आणि त्याला विरोधही तेवढाच होता पण आता ही वसुली सुरु झाल्याचे दिसून आले आहे. जवाहर शेतकरी सहकरी साखर कारखान्याने अशी वसुली केल्याने शेतकरी संतप्त आहेत. ऊस उत्पादक शेतकरी अभिजित पाटील यांनी आपला ऊस कोल्हापूर येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास दिला होता. त्यांच्या बिलातून कोणतीही पूर्वसूचना न देता बिलातून वीज बिलाची कपात करण्यात आली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाल्याचे दिसत आहे.
उसाच्या बिलातून वीज बिल वसुली केल्याच्या प्रकरणी कारखान्याचे चेअरमन आमदार प्रकाश आवाडे यांनी मात्र राज्य शासनाकडे बोट दाखवले आहे. राज्य शासनाने वीज बिल वसुली करण्याचे आदेश दिले असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले आहे. शेतकऱ्याचा परवानगीनेच उसाच्या बिलातून वीज बिल वसूल केले जाईल असेही त्यांनी सांगितले पण प्रत्यक्षात अभिजित पाटील यांना कसलीही विचारणा करण्यात आली नव्हती. परस्पर त्यांच्या उसाच्या बिलातून वीज बिलाची रक्कम कपात करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करू !
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अशा वसुलीला रोकठोक विरोध केलेला आहे. उसाच्या बिलातून वीज बिलांची वसुली करण्याचा निर्णय झाल्यापासून शेतकरी संघटना या विरोधात आक्रमक आहे. शेतकऱ्याच्या संमतीशिवाय उसाच्या बिलातून वीज बील वसूल करण्याचा साखर कारखान्याला कुठलाही अधिकार नाही तरीही अशी वसुली सुरु करण्यात आली आहे. अशी वसुली केली तर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करू अशी भूमिका शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतली आहे.
वाचा : >>
- पंढरपूर, सांगोला तालुक्यात एकाच रात्री १४ दुकाने फोडली !
- हॉटेल मालकाचाच चोराला महागडा मोबाईल पण --
- सहा महिन्यात दुप्पट रक्कम : आणखी तक्रारी दाखल !
- ऊसाचा बिलातून वीज बिल वसुलीला सुरुवात !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !