BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ फेब्रु, २०२२

विनयभंग प्रकरणी दोघांना सक्तमजुरीची शिक्षा, वीस दिवसात निकाल !


पंढरपूर :  एका मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील दोघांना अडीच वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली असून २४ तासात तपास पूर्ण करून २० दिवसात हा निकाल समोर आला आहे. 


पंढरपूर शहरातील समता नगर भागातील एका मुलीचा विनयभंग केल्याची घटना ३० जानेवारी २०२२ रोजी घडली होती. पिडीत मुलगी रात्री जेवण करून रस्त्यावरून शतपावली करण्यासाठी फिरत होती. यावेळी गोपाळपूर येथील विशाल नवनाथ माळी, राहुल अशोक डांगे आणि एक विधीसंघर्षित बालक असे तिघेजण दुचाकीवरून तेथे आले आणि त्यांनी या मुलीच्या मागे जाऊन तिचा विनयभंग केला. अचानक ही घटना घडल्याने मुलगी घाबरली आणि तिने आरडाओरडा केला. मुलगी ओरडू लागल्याने या तिघांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण नागरिकांनी त्यांना पकडून ठेवले आणि पोलिसांच्या हवाली केले होते. 


या आरोपींचा हा पहिलाच प्रकार नव्हता, त्यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हणजे २८ जानेवारी २०२२ रोजी देखील याच भागात शतपावली करणाऱ्या दोन महाविद्यालयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडली होती त्यामुळे या परिसरातील नागरिक आधीच सतर्क होते. ही घटना घडल्यानंतर लगेच दोन दिवसांनी पुन्हा त्यांनी असाच प्रकार केला आणि नागरिकांनी त्यांना पकडले. सदर प्रकरणी पंढरपूर शहर पोलिसात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास निर्भय पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक प्रशांत भागवत यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केवळ चोवीस तासात पूर्ण केला आणि न्यायालयात आरोपपत्र सदर केले, ३० जानेवारी रोजी घडलेल्या या गुन्ह्याचे आरोपपत्र १ फेब्रुवारी रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले होते. 


पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी या गुन्ह्याची सुनावणी जलदगतीने करण्यात यावी याबाबत न्यायालयाला विनंती केली होती. न्यायालयाने देखील हा खटला अत्यंत जलदगतीने चालविला आणि केवळ २० दिवसात या खटल्याचा निकाल देखील देण्यात आला.  आरोपी विशाल नवनाथ माळी आणि राहुल अशोक डांगे या दोघांना दोन वर्षे सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारतीय दंड विधान कलम ३५४, ३४ अन्वये एक वर्षाची सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, कलम ३५४ (अ) नुसार सहा महिने सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद,  कलम ३५४ (ड) नुसार एक वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशा प्रकारे शिक्षा सुनावण्यात आली असून ही शिक्षा एकत्रित भोगायची आहे. त्यामुळे एकूण शिक्षा अडीच वर्षे असली तरी आरोपींना प्रत्यक्ष कारावासात एक वर्षेच रहावे लागणार आहे. 


या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता केतन देशमुख यांनी काम पहिले असून त्यांनी उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे संदर्भ देत सरकार पक्षाची बाजू न्यायालयासमोर मांडली. पंढरपूर शहर पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास करून चोवीस तासांत आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आणि अत्यंत जलदगतीने सुनावणी होऊन आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.  रस्त्यावर छेडछाड करण्याचे प्रकार पंढरपूर शहरात सतत होत असून या निकालाने अशा टवाळखोरावर जरब बसण्यास मोठी मदत होणार आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !