सोलापूर : भीमा नदीसह सोलापूर जिल्ह्यातील सर्व नद्यांवर बॅरेजेस बांधले जाणार असून पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर ९ बॅरेजेस निर्माण करण्यात येतील अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील याची आज सोलापूर येथे दिली.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील याची आज सोलापुरात नियोजन भवन येथे आढावा बैठक आयोजित केली होती. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील सर्व नद्यांवर मोठ्या क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर ९ बॅरेजेस निर्माण करण्यात येतील. प्रत्येक बॅरेजेसची १२ टीएमसी पाणी साठविण्याची क्षमता असेल अशी माहिती देतानाच जलसंपदा विभागात १४ हजार अधिकारी, कर्मचारी यांची भरती केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भीमा नदीवर बांधण्यात येणाऱ्या बॅरेजेसची क्षमता १२ टीएमसी साठवणीची असल्यामुळे लाभक्षेत्रातील जामीन सिंचनाखाली येईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल असा विश्वास यावेळी बोलताना पाटील याची व्यक्त केला. जिल्ह्यातील सर्वच नद्यांवर असे बॅरेजेस बांधण्याचे नियोजन आहे पण सुरुवातीच्या टप्प्यात भीमा नदीवर ९ बॅरेजेस बांधले जातील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी जलसंपदा विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग आणि धरणाची सुरक्षा या मुद्द्यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याची प्रश्न उपस्थित केला तेंव्हा जलसंपदा विभागात येत्या दोन महिन्यात अधिकारी आणि कर्मचारी यांची १४ हजार पदे आउटसोर्सिंगद्वारे भरली जातील असेही त्यांनी सांगितले. ही पदे भरल्यानंतर जलसंपदा विभागास पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल असे पाटील म्हणाले.
सिंचनाच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना वेळेत मिळावा यासाठी जलसंपदा आणि महसूल विभाग भूसंपादन शाखांनी एकत्रितपाने शिबिरांचे आयोजन करावे आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करावे. संपादित केलेल्या जमिनीत योग्य आणि तात्काळ मोबदला देण्यासाठी उचित कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. सिंचनाचे प्रकल्प तसेच प्रस्तावित कामे मंजूर करून ती वेळात पूर्ण करण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कोट्यवधी थकबाकी
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून दरवर्षाला कमीत कमी ३० कोटींची सिंचन पाणीपट्टी मिळणे अपेक्षित आहे पण तसे घडत नाही. दर वर्षाला केवळ १० कोटी रुपयांची सिंचन पाणीपट्टी प्राप्त होते आणि दर वर्षाला २० कोटींची थकबाकी तशीच राहते. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सिंचनाची पाणीपट्टी पूर्ण आणि वेळेत भरण्याचे आवाहन यावेळी जलसंपदा सचिवांनी केले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी विविध समस्या यावेळी बैठकीत मांडल्या तर अधिकारी यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध उपसा सिंचन योजनांची माहिती यावेळी सादर केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !