मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा वाद पेटू लागला असून राज्यभरातून निषेधाचे पडसाद उमटू लागले आहेत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवराय हे प्रत्येकाच्या मनामनात अढळ स्थान असलेले परमदैवत आहेत परंतु महाराजांविषयी काहीतरी बडबड करून राजकारण करण्याचे पातक कुणीतरी मधूनच करीत असते. केवळ राजकारणासाठी शिवरायांच्या नावाचा वापर केला जातो. खोटा इतिहास सांगण्याचा 'पराक्रम' देखील काही जण करीत असतात पण ते उघडे पडतानाही पहायला मिळत असतात. अशा पार्श्वभूमीवर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून महाराष्ट्र संतप्त झाला आहे.
'समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारले असते का '? असा सवाल राज्यपाल कोश्यारी यांनी उपस्थित केला आणि राज्यभर संतापाचे पडसाद उमटू लागले आहेत. औरंगाबाद येथे बोलताना राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी, "देशात गुरु अशी परंपरा आहे की, ज्याला सद्गरु मिळाला म्हणजे सगळे काही मिळाले आणि सद्गुरू नाही मिळाला तर काहीच मिळालं नाही. समर्थांच्या शिवाय शिवाजीला कोण विचारेल तरी का ?" असे विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले. राज्यपाल एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी ' गुरुदक्षिणा म्हणून या राज्याच्या चाव्या तुम्हाला देतो असे शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते' असा देखील दावा कोश्यारी यांनी केला आहे.
या विधानाचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील प्रचंड संताप व्यक्त केला असून आज ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. राज्यपालांनी या विधानाबाबत महाराष्ट्राची माफी मागावी आणि आपले विधान मागे घ्यावे, तसे नाही केले तर त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या गुरु - शिष्य परंपरेचा दूरदूरपर्यंत संबंध येत नाही असा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला होता असे सांगत राज्यपालांनी न्यायालयाचा देखील अवमान केला असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. संभाजी ब्रिगेड देखील प्रचंड आक्रमक झाली असून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.
उदयनराजे संतापले !
राज्यपाल कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर छत्रपती उदयनराजे देखील संतापले असून राष्ट्रमाता जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खऱ्या गुरु होत्या , रामदास हे कधीही गुरु नव्हते हा खरा इतिहास आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी एक प्रकारे महाराजांचा अपमानच केला आहे. त्यामुळे शिवप्रेमीतून संतप्त पडसाद उमटत आहेत. राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !