पंढरपूर : कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची गच्ची पकडून धराधरी केल्याच्या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
नवीन कराड नाका परिसरात एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. या परीसरातील एका हॉटेलवर दोघे जण हॉटेल मालकाशी भांडत होते. हॉटेलचे बिल देण्याच्या कारणावरून हे भांडण सुरु होते. दरम्यान लक्ष्मी टाकळीकडून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडे निघालेले पोलीस कर्मचारी हनुमंत भराटे आणि उपनिरीक्षक गोदे यांनी हा प्रकार पहिला. या पोलिसांनी 'भांडण करू नका' असे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता हॉटेल मालकाशी भांडत असलेल्या दोघांनी पोलिसांनाच अरेरावीची भाषा वापरली.
हॉटेल मालकाशी बिल देण्याच्या कारणावरून भांडत असलेल्या दोघांपैकी एकाने पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. 'आम्हाला सांगणारे तुम्ही कोण ? आम्ही काहीही करू, आम्हाला सांगायचे काम नाही' असे म्हणत पोलिसांना शिवीगाळ केली आणि पोलीस कर्मचारी हनुमंत भराटे यांची गच्ची पकडून धराधरी केली. सदर प्रकरणी पोलिसांनी जुना कराड नाका येथील निलेश तानाजी जाधव आणि नागालँड चौकाच्या पाठीमागे मोहिते पाटील शाळेजवळ राहणारा दीपक आण्णा चव्हाण या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामकाजात अडथळा केल्याच्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !