BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ फेब्रु, २०२२

नेत्यांचे कान भरायचे बंद करा ! प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावली चपराक !

 



सोलापूर :जनतेत मिसळून काम करा, नेत्यांचे कान भरायचे बंद करा अशी सणसणीत चपराक आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लगावली. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांशी नेहमी हसून खेळून असतात पण यावेळचा त्यांचा सोलापूर दौरा काहीसा 'कडक' ठरला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आलेली मरगळ आणि अंतर्गत हेवेदावे यामुळे पक्षाला होत असलेले नुकसान पाहून त्यांनी आपल्या बोलण्याचा गिअर बदललेला असल्याचे दिसत आहे. 'इतरांना पाठींबा द्यावयाची सवय बंद करा' असा आदेश त्यांनी सांगोला येथे दिला तर पंढरपूर येथील कार्यकर्त्यांना जोरदार खडे बोल सुनावले. पोटनिवडणूक झाल्यानंतर पक्षासाठी काय केले ? साखर कारखाना महत्वाचा आहेच पण कारखाना म्हणजे सगळे काही नाही, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काय प्रयत्न केले ? असा अनेक प्रश्नांच्या फैरीच काल जयंत पाटील यांनी झाडल्या आणि आज सोलापूर येथे बोलताना त्यांनी सणसणीत चपराक लगावली आहे. 


सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत असताना देखील अंतर्गत वाद, मतभेद आणि कलह मोठ्या प्रमाणात दिसत आहे. एकूण जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन जयंत पाटील यांनी सोलापूर येथे देखील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे कान उपटले आहेत. राष्ट्रवादी पदाधिकारी मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी स्वकीयांनाच सुनावले आहे. 'नेत्यांचे कान भरायचे बंद करा, जनतेत मिसळून काम करा, जे काम करणार नाहीत त्यांना पदावर ठेवले जाणार नाही' अशा अत्यंत स्पष्ट शब्दात पाटील यांनी पक्ष पदाधिकारी यांना इशारा दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्याना घाम फुटला आहे.  पक्षाचे काम करण्याऐवजी उठसुठ मुंबईला जाऊन स्थानिक पदाधिकारी यांच्याविरोधात नेत्यांच्या कानात कुजबुज करण्याची सवय असलेल्या पदाधिकाऱ्याना हा जोरदार इशारा त्यांनी दिला आहे.


 सोलापुरातील या पदाधिकारी मेळाव्यास सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते त्यामुळे जिल्ह्यातील अशा पदाधिकाऱ्याना हा मोठा इशारा असल्याचे मानले जात आहे.  येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंभर आमदार निवडून आणायचे आहेत आणि सोलापूर शहरात आज एक देखील आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही. केवळ शरद पवार यांच्या कल्पनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आज राज्यात सत्तेत आहे. शरद पवार यांना मानणारे लोक इतर पक्षात आहेत म्हणून आपल्याला हे मानाचे स्थान मिळालेले आहे. काहीही करून पक्षाची शक्ती आपल्याला वाढवावी लागणार आहे त्यामुळे मुंबईला चकरा मारणे बंद करा आणि लोकात मिसळून काम करा असे सणसणीत आणि खणखणीत बोल जयंत पाटील यांनी सुनावले आहेत.


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदे अनेकांनी घेतली पण कोणीही प्रत्यक्षात काम करताना दिसत नसल्याची तक्रार सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी केली होती.  सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणी यांची हजेरी घेऊन उपस्थितीचा अंदाज घेतला. अनेकजण यावेळी अनुपस्थित असल्याचे दिसून आले पण बैठकीचा निरोप मिळालाच नसल्याचे काही पदाधिकारी यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा कार्यकारिणीत बराच गोंधळ असल्याचेही यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या लक्षात आले आणि त्याची दखल देखील त्यांनी घेतली आहे. पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देखील पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत.     


१४ हजार पदांची भरती !

जलसंपदा विभागात १४ हजार पदांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. सोलापूर येथील नियोजन भवन येथे जलसंपदा आढावा बैठकीत बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली.  जलसंपदा विभागाच्या वतीने आउटसोर्सिंगद्वारे येत्या एक दोन महिन्यात १४ हजार अधिकारी, कर्मचारी यांची पदे भरली जाणार असून त्यामुळे जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल असे जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. जलसंपदा विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग तसेच धरण सुरक्षा याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !