BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ फेब्रु, २०२२

अजित पवार यांच्यामुळे उद्धव ठाकरे बिघडले !

 



सातारा : 'अजित पवार यांच्यामुळे उद्धव ठाकरे बिघडले, 'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला' असे म्हणत बंडातात्या कराडकर यांनी आधी उद्धव ठाकरे हे चांगले माणूस होते असे देखील सांगितले. 


वारकरी संप्रदायातील हरीभक्त परायण बंडातात्या कराडकर नेहमीच वादग्रस्त आणि काही वेळा राजकीय विषयावर आपली मते मांडत असतात. अलीकडे तर त्यांचे विधाने नेहमीच येत असून नुकतेच शासनाच्या वाईन धोरणाला त्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात बोलताना त्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे उद्धव ठाकरे हे बिघडले असल्याचे विधान केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी यावेळी बोलताना 'ढवळ्या पवळ्या' ची उपमा दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले माणूस आहेत. हिंदूहृदयसम्राट असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुत्र आहेत. दारू आणावी, मंदिरे बंद करावीत, वाऱ्या बंद काराव्यात अशा विचारांचे उद्धव ठाकरे नाहीत पण 'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला' अशी अवस्था झाली आहे. अजित पवारांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे बिघडले आहेत असे कराडकर यांनी म्हटले आहे. 


तर दुकाने जाळू !

वारकरी नेहमी अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करतात  पण 'नाठाळांच्या माथी हाणू काठी' असं देखील म्हणतात. आज सातारा येथे कराडकर यांच्या नेतृत्वात व्यसनमुक्ती संघटनेचे 'दंडवत आणि दंडुका' असे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ' राज्यातील सर्वच नेत्यांची मुले दारू पितात' असा वादग्रस्त आरोप देखील त्यांनी केला. शासनाने राज्यात शॉपिंग मॉल आणि दुकानातून वाईन विक्रीला परवानगी दिलीही आहे पण कराडकर यांनी वाईनची अशी विक्री करण्यास विरोध दर्शविला आहे. शासनाला वठणीवर आणण्यासाठी आम्हाला कडक उपाय योजना कराव्या लगातील, वेळ पडली तर आम्ही वाईन विक्री करणारी दुकाने जाळू असा इशारा देखील दिला आहे.  


वाईन विरोधातील आंदोलन इथेच थांबणार नाही तर गावोगाव बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा आणखी एक इशारा कराडकर यांनी दिला आहे. बंडातात्या हे नेहमीच काही न काही इशारे देत असतात आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेत असतात. त्यांचे इशारे शासन फारसे गंभीरपणे घेत नाहीच पण शासनाने आता वाईन विक्रीला परवानगी देखील देलेली आहे त्यामुळे या आंदोलनाचे नक्की काय फलित मिळणार आहे याचे उत्तर शोधावे लागणार आहे.


बंडातात्यांचे 'शिस्तबद्ध' आंदोलन ! पण कोरोनाचे काय ? मास्कचे काय ? कोरोना गायब झाला की आंदोलनाकडे कोरोना फिरकत नाही म्हणायचं ?      



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !