मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नवा घेतले तरी अनेकाना धडकी भरते, पण त्यांच्यातील 'माणूस' आज पुन्हा एकदा दिसून आला आणि त्यांनी आपल्या चोपदारांच्या लेकीचा आणि जावयाचा लाडिक हट्ट पुरवला !
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक बोलण्याबाबत प्रसिद्ध आहेत. सामान्य कार्यकर्ता असो की सहकारी मंत्री असो, चूक झाली की अजितदादा अगदी जाहीर सभेत बोलताना देखील अगदी ठेवणीतल्या शब्दांनी त्याची धुलाई करतात. साधेपण जपणारे आणि कडक वाटणारे दादा कधी अत्यंत सामान्य माणसांत एकरूप होऊन जातात. रोखठोक बोलणे आणि काटेकोरपणे वेळ सांभाळणे याबाबतीत किमान राजकारणात तरी त्यांच्यासारखा दुसरा माणूस नाही. दादांचा आवाज आला तरी बडे बडे अधिकारी दचकून, वचकून असतात. काही कुठला मुद्दा काढून दादा 'धुलाई' करतील हे सांगता येत नाही. पण कडक वाटणारी माणसं अनेकदा आतून फणसाच्या गरासारखी मुलायम असतात हे त्यांच्या जवळ गेल्यावरच कळून येतं. हाच अनुभव मंत्रालयातील चोपदाराने घेतला असून दादांच्या वागण्याने त्याच्याजवळच शब्दच संपून गेले आहेत.
मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयात विलास मोरे नावाचे एक चोपदार आहेत. अत्यंत निष्ठेने सेवा करीत ते आता काही दिवसांनी निवृत्त देखील होणार आहेत. मोरे यांच्या मुलीचे, स्नेहाचे चार वर्षांपूर्वीच गणेश साळुंखे यांच्याशी लग्न झाले आहे. स्नेहा आणि गणेश विवाह झाल्यानंतर दोघेही अमेरिकेत गेले आहेत पण कोरोनामुळे ते सद्या भारतातच आहेत. मोरे यांची मुलगी आणि जावई सतत अजितदादांना भेटण्याचा हट्ट करीत होते. दादांच्याकडे त्यांचे काहीच काम नव्हते पण दादांना भेटायची त्यांची इच्छा अनावर होती. मोरे पडले एक चोपदार ! राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची भेट ते कशी घालून देणार ? अजितदादांना ते रोज पाहत होते, नमस्कार करीत होते पण आपल्या लेकीची आणि जावयाची इच्छा सांगण्याचं धाडस त्यांचं होत नव्हतं.
अखेर मोरे यांनी लेक आणि जावई यांची इच्छा पूर्ण करायचयं ठरवलं आणि धाडस करून त्यांनी अजितदादांना आपल्या मुलीची आणि जावयाची इच्छा सांगून टाकली. सद्या अजितदादा अत्यंत व्यस्त आहेत हे मोरे रोजच पाहत आहेत त्यामुळे 'बोलून तर टाकले, आता दादा कधी सांगतील तेंव्हा पाहू' असा विचार त्यांच्या मनात येण्याच्या आधीच अजितदादांनी त्यांना लगेच होकार देऊन टाकला. एवढेच नाही तर दुसऱ्याच दिवशी त्यांना भेटण्यासाठी बोलावले देखील ! मोरे यांचा आनंद अनावर होता. दुसऱ्याच दिवशी मुलगी स्नेहा आणि जावई गणेश हे अजितदादांना भेटले. दादांनी देखील मंत्रीपदाची झूल बाजूला ठेऊन अत्यंत आस्थेने त्यांची आणि कुटुंबाची चौकशी केली. स्नेहा आणि जावयाची कर्तबगारी ऐकून दादांनी चोपदार मोरे यांचेही कौतुक केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांनी केलेले कौतुक, मुलगी आणि जावयाचा पुरलेला हट्ट यामुळे मोरे यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू थांबायला तयार नव्हते. त्यांची लेक आणि जावई हे देखील अजितदादांच्या आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या बोलण्याने भारावून गेले होते. दादांनी या दोघांशी अत्यंत घरगुती वातावरणात संवाद साधला, मनमोकळ्या गप्पा मारताना लहान सहान गोष्टींची देखील विचारपूस केली. गल्लीतला साधा एखादा कार्यकर्ताही सामान्य माणसांशी बोलताना तोऱ्यात असतो आणि स्वतःला कुणीतरी मोठा नेता समजत असतो. अजितदादांच्या सारखा मोठा नेता देखील चोपदाराच्या लेक आणि जावयाशी घरातील सदस्याप्रमाणे बोलत राहिले. एरवी अत्यंत कडक वाटणाऱ्या दादांचे हे एक वेगळे रूप सगळ्यांनीच आपल्या डोळ्यांनी पाहिले. काही दिवसात सेवेतून निवृत्त होणाऱ्या चोपदार विलास मोरे याना तर आपल्या आयुष्यभराची सेवा फळाला आली असे वाटले नसते तरच नवल !
.............

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !