औरंगाबाद : निवडणुकीत उभे राहण्यासाठी 'बायको पाहिजे' असे फलक त्याने लावले पण भाजपच्या महिलांनी या फलकावर शाई टाकून पाटलांच्या या मागणीचा निषेध केला आणि गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. दरम्यान त्यांच्यावर एक गुन्हा देखील दाखल झाला आहे.
औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी रमेश पाटील यांनी 'निवडणूक लढण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे' अशी जाहिरात असलेले फलक लावण्यात आले होते आणि या फलकांची शहरभरच नव्हे तर राज्यभर चर्चा झाली होती. या रमेश पाटील यांचे लग्न झालेले आहे आणि त्यांना तीन अपत्येही देखील आहेत. तरीही त्याने 'बायको पाहिजे' अशी जाहिरात केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार घरातील कुणी तरी राजकारणात पाहिजे अशी प्रबळ इच्छा आहे पण तीन अपत्य असल्यामुळे निवडणुकीला उभे राहता येत नाही, म्हणून आपण उमेदवार बायको पाहिजे असे फलक लावले आहेत. निवडणुकीसाठी कुणी असे केले तर त्याची चर्चा ही होणारच ! त्याप्रमाणे चर्चा झाली आणि बायको मिळो अथवा न मिळो पण या पाटलांना राज्यभर प्रसिद्धी मात्र मिळाली.
फलक लावल्यानंतर या पाटील महाशयाने फलकासोबत आपले फोटोही काढून घेतले. लोक चर्चा करू लागल्याचे पाहून त्यांना मज्जा वाटू लागली आणि फुकटच्या प्रसिद्धीने गुदगुल्याही होत राहिल्या पण भारतीय जनता पक्षाच्या महिलांनी या फलकाला आणि त्यावरील मागणीला जोरदार आक्षेप घेतला आहे. हा महिलांचा अवमान असल्याचे सांगत त्यांनी रमेश पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संतप्त झालेल्या महिलांनी या फलकावर काळी शाई टाकत फलक फाडून टाकले आहेत. औरंगाबाद महानगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक विकास मोहाडी यांनी रमेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनधिकृतपणे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केले असा आरोप ठेवत क्रांती चौक पोलीस ठाण्यात रमेश पाटील यांचावर गुन्हा देखील दाखल झाला आहे .
'आपल्याला तीन अपत्ये असल्याने आपण निवडणूक लढवू शकत नाही, त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी बायको पाहिजे, जातीची अट नाही, वय वर्षे २५ ते ४०, अविवाहित, विधवा, घटस्फोटीत चालेल. फक्त दोन अपत्यापेक्षा जास्त असणारी चालणार नाही' अशा प्रकारचा हा फलक आहे. हा फलक रमेश विनायकराव पाटील यांनी लावलेला असून अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. महानगरपालिका निवडणूक लढविण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे पण त्यांना तीन अपत्य आहेत त्यामुळे ते अपात्र ठरतात. अर्थातच त्यांना निवडणूक लढवत येत नाही. म्हणून त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !