सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या पाच हजाराचा टप्पा ओलांडून पुढे गेली असून सद्याची सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार ११ एवढी झाली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अधिक धसका घेण्यात आला होता परंतु सुदैवाने दुसऱ्या लाटेसारखा धुमाकूळ या लाटेने घातला नाही. कोरोना प्रसाराचा वेग अधिक असला तरी रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हते परंतु यावेळी तसे काही घडले नाही हा एक मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाची लागण झाली तरी देखील रुग्णालयात उपचार घेतलेच पाहिजेत असे रुग्ण अंत्यंत कमी प्रमाणात आहेत आणि बहुतेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. सोलापूर शहरात २ हजार २०७ रुग्णांपैकी ९४२ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत तर ग्रामीण भागातील २ हजार ८०४ रुग्ण असले तरी बहुतेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.
कोरोनाची तिसरी लाट आता ओसरू लागल्याचे दिसत असून आरोग्य मंत्र्यानीही तसे सांगितले आहे. रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या देखील आता कमी होताना दिसत असून काल ३० जानेवारी रोजी ग्रामीण भागात १ हजार ६३१ जणांच्या चाचणीत २९३ रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित असल्याचे आले आहेत परंतु यातील बहुतेक रुग्णांना कसलीही लक्षणे जाणवत नाहीत. बाधित आढळलेल्या या रुग्णांत बहुतेक रुग्ण हे कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेले आहेत. शहरात १ हजार १०७ चाचणीत केवळ ८० व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पंढरपूर आणि बार्शी तालुक्यात सतत अधिक रुग्णांची नोंद होत गेली आहे. कालच्या अहवालानुसार देखील पंढरपूर तालुक्यात सर्वात अधिक ६७ रुग्ण आहेत तर त्या खालोखाल बार्शी तालुक्यात ४९ आणि माळशिरस तालुक्यात ४८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हे तीन तालुके सोडले तर अक्कलकोट, मोहोळ, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील रुग्णांची संख्या वेगाने कमी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे काल रविवारी जिल्ह्यात एकही कोरोना बळी नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !