मंगळवेढा : मरवडे येथील विषबाधा प्रकरणी आरोपींना अटक करण्यात पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोपी करीत त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेने आज मंगळवेढा तालुक्यात रास्ता रोको आंदोलन केले.
मंगळवेढा येथील लोकाप्रतीनिधिनी एवढी मोठी घटना घडून विधानसभेत अवाक्षर काढले नाही. अवैध व्यवसायाबाबत आवाज उठविणारे लोकप्रतिनिधी एवढ्या संवेदनशील विषयावर गप्प कसे राहतात असा सवाल 'जनहित' चे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी उपस्थित केला
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील एका कुटुंबाला दुध डेअरीतून आणलेले दुग्धजन्य पदार्ध भलतेच महागात पडले असून दोन चिमुकल्या बहिणींचा या विषबाधेत मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने सोलापूर जिल्हा हळहळला होता. मरवडे येथील आबासाहेब चव्हाण यांच्या कुटुंबातील काही जणांना विषबाधा झाली होती. चव्हाण यांनी मंगळवेढा येथून श्री समर्थ डेअरी येथून श्रीखंड, बासुंदी, रबडी, पनीर असे पदार्थ घरी आणले होते. ते खाल्ल्यानंतर आबा चव्हाण, त्यांची पत्नी सुषमा चव्हाण, त्यांची सहा वर्षे वयाची मुलगी भक्ती आणि चार वर्षे वयाची मुलगी नम्रता, आबासाहेब चव्हाण यांचे वडील दगडू चव्हाण (वय ७०) उलट्या जुलाबाच त्रास होऊ लागला. मळमळ होऊन पोटात दुखू लागले त्यामुळे तातडीने ते मंगळवेढा आणि पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. दुर्दैवाने उपचार सुरु असताना भक्ती आणि नम्रता या दोन सख्ख्या बहिणींचा विषबाधेने मृत्यू झाला. या घटनेने मरवडे गावासह मंगळवेढा तालुक्यात शोकाकुल वातावरण झाले होते.
सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी मंगळवेढा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवेढा येथल श्री समर्थ डेअरीचे संतोष लहू कोंडूभैरी आणि आकाश धोंडीराम फुगारे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर विषबाधा ही दुग्धजन्य पदार्थातून झाली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे त्यामुळे या विक्रेत्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ कलम व नियमन २०११ चे उल्लंघन झाले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाला परंतु आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही याची मंगळवेढा तालुक्यात चर्चा होत होती. एवढी मोठी घटना घडलेली असतानाही आरोपी मोकाट कसे आहेत ? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.
जनतेत चर्चा आणि पोलिसांच्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त होत असताना पोलीस मात्र शांत होते त्यामुळे जनहित शेतकरी संघटना आज सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून रस्त्यावर उतरली आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. मंगळवेढा पोलीस ठ्ण्याचे पोलीस निरीक्षक ज्यातीराम गुंजवटे यांनी अद्याप आरोपींना अटक कशी केली नाही ? असा सवाल उपस्थित करीत पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात यावे आणि त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात करण्यात आली.
या आंदोलनात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवराज घुले, लतीफ तांबोळी, सुरेश पवार, नामदेव गायकवाड, दत्तात्रय गणपाटील, राजाराम पोतदार, अजित पवार, शिवाजी पवार, रजाक मुजावर, संतोष पावावर, राजाराम कालीबाग, संभाजी रोंगे, प्रकाश सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते. सदर आंदोलनामुळे मंगळवेढा- विजापूर मार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास खोळंबली होती. उप विभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी यावेळी अटकेबाबत आश्वासन दिले. विषबाधा प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल असे राजश्री पाटील यांनी सांगितले. उप विभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले. एवढ्या मोठ्या घटनेतील आरोपीला अटक करण्यासाठी आंदोलन करावे लागते ही बाब धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पोलिसांनी अद्याप सदर आरोपींना अटक न केल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !